हिंगोली : न्यायालयाकडून वेळोवेळी समन्स निघूनही तारखेवर हजर न राहणाऱ्या १८ जणांना पोलिसांनी पकडून त्यांना न्यायालयात हजर केले. या संदर्भात पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली १० ऑक्टोबर रोजी विशेष मोहीम राबविण्यात आली.
गुन्हे प्रतिबंध व गुन्हेगारांवर वचक राहावा, न्यायालयीन प्रकरणांचा निपटारा लवकरात लवकर व्हावा, साक्षीदार व आरोपी हे समन्स व वॉरंटनुसार न्यायालयात वेळेवर हजर व्हावेत यासाठी पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार १० ऑक्टोबर रोजी वॉरंट बजावणी विशेष मोहीम राबविण्यात आली. न्यायालयाकडून वेळोवेळी समन्स निघूनही तारखेवर हजर न राहणाऱ्या १८ जणांना ताब्यात घेतले. यात १७ अटक वॉरंट व १ पोटगी वॉरंटमधील व्यक्तींचा समावेश आहे. त्यांना पकडून न्यायालयात हजर करण्यात आले. ही कार्यवाही अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, उप विभागीय पोलिस अधिकारी संदिपान शेळके, पोलिस ठाण्याचे अधिकारी, अंमलदार यांच्या पथकाने केली.