गोरेगाव (जि. हिंगोली) : पीकविमा कंपनीने दोन हेक्टर क्षेत्रांवरील पीक नुकसानभरपाईबद्दल केवळ ८३४ रुपये एवढाच विमा परतावा देत शेतकऱ्यांची थट्टा चालविली आहे. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांकडून ही रक्कम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चेकद्वारे परत करीत निषेध नोंदविण्यात आला आहे.
गत पाच वर्षांपासून निसर्गाच्या अवकृपेमुळे नापिकी व उत्पन्नघटीच्या फटक्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यातच पीकहानीच्या जोखमीतून वाचण्यासाठी शेतकऱ्यांकडून पीकविमा भरला जात आहे. मात्र, पीक नुकसानीबाबत जाचक अटी व निकष लावत विमा कंपनीकडून विम्याचा लाभ डावलला जात आहे, तर कधी अत्यल्प प्रमाणात विमा परतावा देत शेतकऱ्यांची थट्टाच मांडल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
सेनगाव तालुक्यातील वरखेडा येथील शेतकरी बालाजी राजाराम शिंदे यांनी गेल्यावर्षी खरीप हंगामात दोन हेक्टर क्षेत्रांवरील पीकविमा काढला होता. ही विमा पॉलिसी अंतर्गत वर्षभराने का होईना शिंदे यांच्या बँक खात्यात २० सप्टेंबर २०२२ रोजी विमा कंपनीकडून पीक नुकसानभरपाई परतावा म्हणून ८३४ रुपये जमा केले. पीकविमा कंपनीच्या थट्टेबद्दल संताप व्यक्त करीत शिंदे यांच्याकडून ८३४ रुपये थेट पंतप्रधानांना धनादेशाद्वारे परत करण्यात आले. १४ ऑक्टोबर रोजी तहसीलदार जीवककुमार कांबळे यांना निवेदन देत तहसीलदारांकडे धनादेश सुपूर्द करण्यात आला.
अठराशे रुपये खर्च करत विमा भरला...गतवर्षी खरीप हंगामात दोन हेक्टर क्षेत्रासाठी अंदाजे अठराशे रुपये खर्च करीत पीकविमा हप्ता भरला होता; परंतु त्या बदल्यात परतावा म्हणून केवळ ८३४ रुपये देऊन विमा कंपनीने थट्टा केली. हा प्रकार बघता ही ‘प्रधानमंत्री पीकविमा योजना’ नसून एक प्रकारची फसवणूक योजना आहे.- बालाजी शिंदे, शेतकरी, वरखेडा.