लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महावितरणच्या वतीने प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना, म्हणजेच ‘सौभाग्य’ योजनेच्या माध्यमातून ज्या गावामध्ये ८० टक्क्यांपेक्षा अधिक दलित वस्ती आहे व गरीब कुटुंबांची संख्याही अधिक आहे, अशा राज्यभरातील १९२ गावांत १०० टक्के विद्युतीकरण करण्यात येणार आहे.नांदेड परिमंडळातील २५ गावांचा समावेश ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत करण्यात आला असून या गावातील दलित वस्त्यांमध्ये शंभर टक्के विद्युतीकरण केले जाणार आहे. जिल्हयातील अद्याप वीज न पोहोचलेल्या कुटूंबांना वीजजोडणीचे काम महावितरणच्या माध्यमातून केले जाणार आहे. डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त १४ एप्रिल पासून सुरू होणाऱ्या ‘ग्राम स्वराज्य अभियान’ अंतर्गत नांदेड जिल्हयातील २० तर हिंगोली जिल्ह्यातील पाच गावांचा सदर योजनेत समावेश आहे. या गावांमध्ये शंभर टक्के विद्युतीकरण करण्यासाठी गाव निहाय शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून ज्या गावात दलितांची संख्या ८० टक्क्यांपेक्षा अधिक आहे व गरीब कुटुंबांचे प्रमाणही जास्त आहे अशा गावामध्ये शंभर टक्के विद्युतीकरण केले जाणार आहे. सदरील अभियानात संबंधीत गावातील अद्याप वीज जोडणी नसलेल्या ग्रामस्थांनी दिलेल्या गावनिहाय तारखेला शिबिरामध्ये उपस्थित राहून वीज जोडणीचा लाभ घ्यावा असे आवाहन महावितरणच्या नांदेड परिमंडळाचे प्रभारी मुख्य अभियंता आजिनाथ सोनवणे तसेच हिंगोली मंडळाचे अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव यांनी केले. महावितरणच्या या उपक्रमामुळे अनेक लाभार्थ्यांना सदर योजनेचा लाभ घेता येणार आहे.ज्यांच्याकडे पूर्वी मीटर होते, परंतु ते थकबाकीमुळे काढून नेले असतील त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. असे महावितरणचे उप कार्यकारी अभियंता दिनकर पिसे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.सेनगाव तालूक्यातील सिंदेफळ हिंगोली तालुक्यातील कलगाव,देवठाणा, कळमनुरी तालूक्यातील तुप्पा, वसमत येथील कौडगाव आदी गावांत कॅम्प भरविले जाणार असल्याचे महावितरण तर्फे सांगण्यात आले.