हिंगोली : जिल्ह्यात महिला व बालकल्याण विभागाकडून अंगणवाड्यांत दरमहा बालकांचे वजन घेतले जात असून त्यात १९५८ बालके कुपोषित आढळून आली आहेत. ाया बालकांना योग्य पोषण आहार देवून कुपोषणातून बाहेर काढण्यासाठी बालविकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार होती. मात्र यासाठीची निविदा वादात अडकल्याने राज्यभर ही योजना ठप्प आहे.
दिवसेंदिवस कुपोषणाचे प्रमाण वाढतच चालले आहे. हिंगोली जिल्ह्यात १0८९ अंगणवाड्यांत १ लाख ४४0 बालके आहेत. यातील ८२ हजार बालकांचे वजन घेतले. यापैकी ७१ हजार ५६0 बालके सर्वसाधारण आढळली. तर ८४८९ मध्यम कमी वजनाची बालके आहेत. अशा बालकांच्या मातांना महिला व बाल कल्याण विभागाकडून बालकांची काळजी घेण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले आहे. मात्र १९५८ बालके तीव्रकमी वजनाची आढळली आहेत. यात प्रकल्पनिहाय कळमनुरी-१६७, वसमत-३४३, हिंगोली-४२५, सेनगाव-४९५, औंढा ना.-३२५, आखाडा बाळापूर-२0३ अशी बालकांची संख्या आहे. यापैकी ४७६ बालकांना तर आरोग्य विभागाच्या देखरेखीखाली कुपोषणातून बाहेर काढणे गरजेचे आहे. यात कळमनुरी-१२६, वसमतगऽ८, सेनगाव-१२८, औंढा ना.-७0 व बाळापूर-३६ अशी संख्या आहे.
मध्यंतरी शासनाने राज्य स्तरावरूनच कुपोषित बालकांसाठी आहार खरेदी करून तो बालविकास केंद्रात वाटप करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र ही निविदाच वादात अडकली अन् प्रशासनाने करून ठेवलेली तयारीही वाया गेल्याचे दिसत आहे.