जिल्ह्यात शासकीय यंत्रणा तसेच खासगी डॉक्टरांबाबत राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम राबविण्यात आला. २०१९ मध्ये शासकीय यंत्रणेमार्फत ११९६, तर खासगी डाॅक्टरांमार्फत १८२, २०२० मध्ये शासकीय यंत्रणेमार्फत ९५१, तर खासगी डॉक्टरांमार्फत ९३ रुग्ण शोधले गेले आहेत. दुसरीकडे, जानेवारी ते जून २०२१ या काळात शासकीय यंत्रणेमार्फत ३८२, तर खासगी डॉक्टरांमार्फत ५६ क्षयरोग रुग्ण तपासणीअंती आढळून आले आहेत. १ जुलै ते ऑक्टोबर २०२१ या कालावधीत प्रत्येक गावात आशा वर्करमार्फत क्षयरुग्ण शोधण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. सर्वेक्षणादरम्यान आढळलेल्या संशयित क्षयरुग्णाची थुंकी तपासणी केली जाते. यासाठी क्ष-किरण यंत्रणाही ग्रामीण भागात उपलब्ध करून दिली आहे. थुंकी दूषित रुग्णांच्या घरातील बालकांना क्षयरोगाची बाधा होऊ नये म्हणून आयसोनीझाईड ही गोळी वजनानुसार सहा महिने देण्यात येते. तसेच बीसीजी ही लस लसीकरण मोहिमेअंतर्गत दिली जाते. ज्यामुळे लहान मुलांना क्षयरोग होण्यापासून संरक्षित केले जाते.
... अशी आहेत प्रमुख लक्षणे
दोन आठवड्यांपेक्षा जास्त दिवस खोकला असणे, दोन आठवड्यांपेक्षा जास्त दिवस मुदतीचा ताप, वजनात लक्षणीय घट, भूक मंदावणे, मानेवर गाठी येणे, आदी या प्रकारची लक्षणे जाणवू लागल्यास लगेच जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधणे आवश्यक आहे. अशा प्रकारच्या रुग्णांनी यात कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा करू नये, असे आरोग्य विभागाने सांगितले.
प्रतिक्रिया...
जिल्ह्यात १६ प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण स्तरावर थुंकी तपासणी केंद्र कार्यान्वित करण्यात आली आहेत. प्रत्येक तालुक्यात क्षयरोग कार्यक्रम देखरेखीसाठी उपचार पर्यवेक्षक, प्रयोगशाळा कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा समन्वयक बी. एस. उबाळे, सुपरवायझर आर. व्ही. घुगे व इतर कर्मचारी सहकार्य करीत आहेत.
- डॉ. जी. एस. मिरदुडे, जिल्हा क्षयरोग अधिकारी