हिंगोली : दीपावलीनंतर नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचे संकेत शासनाने दिले आहेत. आश्रमशाळादेखील सुरू होणार आहेत. त्या अनुषंगाने शिक्षण विभाग आणि समाजकल्याण विभाग तयारीला लागला आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने वसतिगृहे मात्र सध्याच उघडणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
हिंगोली जिल्ह्यात समाजकल्याण विभागाच्या अखत्यारीत एकूण २० आश्रमशाळा असून, तेवढीच वसतिगृहेदेखील वसलेली आहेत. कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटामुळे ज्याप्रमाणे प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा अद्याप सुरू झाल्या नाहीत, त्याचप्रमाणे आश्रमशाळासुद्धा बंद असून निवासी वसतिगृहेदेखील खाली केली होती. शासनाच्या संकेतानंतर आता आश्रमशाळा सुरू होणार असल्याची माहिती प्राप्त झाली. आश्रमशाळांच्या परिसरात स्वच्छता केली आहे. मूत्रीघर, शाैचालयेदखील स्वच्छ झाली आहेत. आश्रमशाळांमधील वर्गखोल्या सॅनिटाईझ करण्यात येणार आहेत.