कळमनुरी : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत तालुक्यात ४५ ग्रामपंचायतींमध्ये १४२ कामे सुरू आहेत. या कामांवर २ हजार २०० मजूर आहेत. रोहयोअंतर्गत कोरोना काळातही २२०० मजुरांना रोजगार उपलब्ध झाला आहे. सध्या ४५ ग्रामपंचायतींमध्ये घरकुल, सिंचन विहिरी, वृक्ष लागवड व संगोपन, रोपवाटिका, फळबाग लागवड, तुती लागवड आदी कामे सुरू आहेत. मजुरांना कामाच्या मोबदल्यात मजुरी दिली जाते. प्रत्येक मजुराला कमीत कमी २४८ रुपये मजुरी मिळावी, ही अपेक्षा असते. यापूर्वी मजुरांना २३८ रुपये मजुरी होती. १ एप्रिलपासून मजुरांच्या मजुरीत दहा रुपयांनी वाढ करण्यात आलेली आहे. मजुरांच्या खात्यावर ऑनलाइन मजुरी जमा केली जाते. या माध्यमातून ग्रामीण भागातील मजुरांना मोठा आधार मिळाला आहे. कोरोनामुळे बेरोजगारीची कुऱ्हाड अनेकांवर कोसळली आहे; परंतु मनरेगा अंतर्गत होत असलेल्या कामामुळे मजुरांना गावातच मजुरी मिळालेली आहे.
जिल्ह्यात मागील सहा दिवसांपासून संचारबंदी असल्याने सर्व व्यवहार ठप्प आहेत. त्यामुळे अनेकांच्या हाताला काम मिळत नाही. परंतु मनरेगाअंतर्गत गावातील प्रत्येक ग्रामस्थांना या माध्यमातून रोजगार मिळत आहे. जॉबकार्ड असलेल्या व्यक्तीने कामाची मागणी केल्यास प्रशासनातर्फे मागेल त्याला काम उपलब्ध करून दिले जाते. ही कामे सुरक्षित अंतराचे पालन करून तसेच मास्कचा वापर करून शासनाने दिलेल्या सर्व नियमांचे पालन करून मजूरही कामे करीत आहेत.
संचारबंदी व कोरोनाकाळ असल्याने रोहयोच्या प्रत्येक कामावर पाच ते दहा मजूर असतात. प्रत्येक कामावर कोरोनाच्या नियमाचे तंतोतंत पालन केले जात असल्याचे पंचायत समितीतून सांगण्यात आले. मजुरांनी आठ दिवस काम केल्यानंतर मजुरांच्या ऑनलाइन बँक खात्यावर मजुरी जमा केली जाते. रोहयोच्या कामांना कोरोना काळात मागणी वाढलेली दिसत आहे.