हिंगोली : विजया भागवत एकादशीच्या दिवशी भगर खाल्ल्याने सेनगाव तालुक्यातील खुडज येथील २४ भाविकांना विषबाधा झाली. यातील २० भाविकांना सेनगाव येथील शासकीय रूग्णालयात तर एका भाविकास हिंगोली येथील खासगी रूग्णालयात ७ मार्च रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास दाखल करण्यात आल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.
सेनगाव तालुक्यातील खुडज येथील भाविक दर पंधरवड्या एकादशीला नर्सी नामदेव येथे दिंडी घेऊन जातात. ७ मार्च रोजी नेहमीप्रमाणे २० ते २५ भाविक खुडज येथून नर्सी येथे गेले होते. नामदेव महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर ते परत खुडजकडे निघाले. वाटेत हिंगोली- सेनगाव मार्गावरील गिलोरी फाटा येथे त्यांनी आपल्या सोबत नेलेली भगर व शेंगदाण्याची आमटी शिजवून खाल्ली. त्यानंतर सर्व भाविक गावाकडे परतले. परंतु, रात्री ८:३० वाजेच्या सुमारास काही भाविकांना मळमळ होऊन उलट्या होत होत्या. तर काहीचे डोके दुखत होते. त्रास वाढत असल्याने रात्री १०:३० वाजेच्या सुमारास २० भाविकांना सेनगाव येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले. तर एका महिलेला हिंगोलीच्या खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.
सध्या सेनगाव येथील शासकीय रूग्णालयात रामचंद्र संभाजी साबळे (५५), वच्छलाबाई रामचंद्र साबळे (५०), सिताराम संभाजी साबळे (६५), लिलावती बळीराम धोटेकर (७०), सिताराम नामदेव झाटे (५७), अश्विनी गोपाळ टाले (२६), पुरूषोत्तम माणिकराव टाले (५५), लक्ष्मीबाई नारायण झाडे (४५), वर्षा विठ्ठल झाडे (४०), किसन तान्हाजी झाटे (६५), आश्रोबा नामाजी झाडे (६०), मंजूळाबाई कुंडलिक झाटे (५०), विठ्ठल बळीराम टाले (६०), छाया रमेश टाले (३५), राजेश त्र्यंबक टाले (४५), द्वारकाबाई बालकिशन झाडे (५५), रामेश्वर बालकिशन झाटे (४०), सविता रामेश्वर झाडे (३५), कमल दत्ता गिरी (४५), निवृत्ती विठोबा टाले (५९) यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. तर अन्नपूर्णाबाई गंगाराम टाले यांच्यावर हिंगोली येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या सर्व भाविकांची प्रकृती चांगली असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.