लोकमत न्यूज नेटवर्कवारंगाफाटा : राष्ट्रीय महामार्गालगत कळमनुरी तालुक्यातील कुर्तडी येथे आखाड्यावरून ढोल केलेले हळदीचे २४ कट्टे चोरीस गेल्याची घटना १४ मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.राष्ट्रीय महामार्गालगत बाळासाहेब अबनराव पानपट्टे यांचे शेत आहे. १४ मे रोजी त्यांनी आपल्या शेतातील आखाड्यावर वाळलेल्या हळदीला रंग येण्यासाठी ढोल करून २५ कट्टे भरून, शिवून ठेवली होती. सदरील २५ पैकी २४ कट्टे हळद चोरट्यांनी चोरून नेली. महामागार्पासून आखाड्याचे अंतर अंदाजे ४०० ते ५०० फूट असून चोरट्यांनी डोक्यावरून वाहनात टाकून हळद लंपास केल्याचा अंदाज शेतकऱ्यांतून वर्तविला जात आहे. विशेष म्हणजे नेहमीप्रमाणे बाळासाहेब यांचे वडील अबनराव हे शेतात हळद राखणीसाठी जागलीला होते. शेतात एक कुत्रा होता. शेजारच्या आखाड्यावरही माणसे असताना एकालाही सर्व कट्टे घेऊन जाईपर्यंत जाग आली नाही, याचे आश्चर्य व्यक्त होत आहे. २४ कट्टयांचे १३ ते १४ क्विंटल एवढे वजन होते. ७ ते ८ हजार रूपये या सध्याचे दराप्रमाणे किमान ९० हजार ते १ लाख रुपयांची हळद चोरट्यांनी लंपास केली आहे. शेतकºयाची हळद चोरट्यांनी चोरून नेल्याने दुष्काळात तेरावा महिना, असे म्हणण्याची वेळ आली आहे. सदरील चोरी झाल्याची माहिती आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात समजताच वारंगा फाटा पोलीस मदत केंद्राचे अशोक कांबळे, संदीप टाक यांनी आज १५ रोजी घटनास्थळास भेट दिली. मात्र याप्रकरणी मंगळवारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल नव्हता.
कुर्तडीत हळदीचे २४ कट्टे लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 1:25 AM