आखाडा बाळापूर ( हिंगोली ): कळमनुरी तालुक्यातील येलकी येथील सशस्त्र सीमा बलाच्या कॅम्प परिसरात आज झालेल्या पहिल्या दीक्षांत समारंभात ११ राज्यातील २४५ सैनिकांनी देशसेवेची शपथ घेतली. ४४ आठवड्याच्या कठोर प्रशिक्षणानंतर हे सैनिक आता देशभरात सेवा देण्यासाठी सज्ज आहेत, असे गौरवोद्गार सशस्त्र सीमा बलाचे उपमहानिरीक्षक सेरिंग दोर्जे यांनी याप्रसंगी व्यक्त केले. चीन, पाकिस्तान आणि भूतानच्या सीमा आणि काही राज्यांतील ७६ बटालियनमध्ये हे सैनिक दाखल होतील अशी माहितीही यावेळी दोर्जे यांनी दिली.
कळमनुरी तालुक्यातील येलकी येथील सशस्त्र सीमा बलाच्या कॅम्प परिसरात आज या कॅम्पमधील पहिला दीक्षांत समारंभ पार पडला. 245 नवप्रशिक्षित सैनिकांचा शपथविधी सोहळा भव्य स्वरूपात पार पडला .देशाच्या विविध भागातील सशस्त्र सीमा बलामध्ये भरती झालेल्या नवा प्रशिक्षितांचे 44 आठवड्यांचे कठीण प्रशिक्षण पार पडले. त्यानंतर आज त्यांचा दीक्षांत सोहळा सशस्त्र सीमा बल कॅम्पच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून सशस्त्र सीमा बलाचे ( विशेष प्रचालन विभाग ,गया ) येथील महानिरिक्षक सेरिंग दोर्जे , हिंगोलीचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर , जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, सीआरपीएफ कॅम्प मुदखेडचे कमांडंट लीलाधर महाराणी, एस. आर .पी .एफ. प्रशिक्षण केंद्र हिंगोलीचे कमांडंट संदीपसिंग गिल , पुरुषोत्तम यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले होते.
डोळ्यांचे पारणे फेडणारे चित्तथरारक प्रात्यक्षिके यावेळी जवानांनी सादर केली. सोहळ्याला अधिकाऱ्यांसोबत जवानांचे कुटुंबीयही मोठ्या प्रमाणावर हजर झाले होते. हिंगोली जिल्ह्यात प्रथमच असा सोहळा पार पडला असून यामुळे तरुणांना स्फूर्ती मिळेल असेही उपस्थित बोलत होते. सशस्त्र सीमा बलाच्या सोळाव्या वाहिनीचे कमांडंट विनय कुमार सिंह , उप कमांडट अंजनी कुमार तिवारी, सहायक कमांडंट पंकज साहा , डॉ. बी .विष्णू प्रियंका, निरीक्षक सिकंदर कुमार, हराराम, शशि कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली हा भव्य दीक्षांत सोहळा पार पडला. सोहळा यशस्वितेसाठी उपनिरीक्षक अजयकुमार, सहाय्यक उपनिरीक्षक शामलाल ,सहाय्यक अशोक मंडल ,राम लाल, रोहित दिक्षित ,सचिन कुमार , रणसिंग अमर, बाबासाहेब शिंदे आदींनी प्रयत्न केले.