लोकमत न्यूज नेटवर्कवसमत : तालुक्यातील अनुसूचित जाती-जमाती व नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेंतर्गत नवीन विहीर करणे, जुनी विहीर दुरुस्ती व कृषी साहित्याकरिता आॅनलाइन मागविण्यात आले होते. प्राप्त ८६३ अर्जापैकी २० टक्के अर्जात त्रुट्या आहेत. त्यामुळे अर्जातील त्रुटींची पूर्तता करण्याचे आवाहन गटविकास अधिकारी विठ्ठल सुरोसे यांनी केले आहे.तालुक्यात जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेतंर्गत सन २०१८-१९ साठी आॅनलाइन अर्ज ८ आॅगस्ट ते ९ सप्टेंबर दरम्यान मागविण्यात आले होते. त्यानुसार वसमत पंचायत समितीकडे ८६३ अर्ज प्राप्त झाले होते. सदरील अर्जाची छाननी केली असता यापैकी जवळपास २० टक्के अर्ज हे त्रुटीत निघाले असून त्रुटीतील अर्जांची यादी नोटीस फलकावर लावण्यात आली आहे.या अर्जाच्या त्रुटी मध्ये प्रामुख्याने सातबारा-होल्डिंग प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड आदी त्रुटींचा समावेश आहे. सदरील योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदारांनी ९ आॅक्टोबर या अंतिम मुदतीपर्यंत त्रुटींची पूर्तता करावी. तसेच प्रत्येक अर्जदारांनी आपल्या अर्जाची माहिती पंचायत समिती कार्यालयातील माहिती फलकावर लावलेल्या यादीतून तपासून घ्यावी. असे आवाहन पंचायत समिती कृषी अधिकारी जी.बी.दहीवडे यांनी केले आहे.
स्वावलंबन कृषी योजनेचे २५ टक्के अर्ज त्रुटीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2018 12:19 AM