समग्र शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीपर्यंतच्या जिल्हा परिषद, शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी अनुदानित शाळांतील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके उपलब्ध करून दिली जातात. हिंगोली जिल्ह्यात २०२०-२१ या वर्षात एकूण ७ लाख ८२ हजार पुस्तके मिळाली होती. यात हिंगोली तालुक्यात ३२ हजार ३१९ जणांना १.८३ लाख पुस्तके, सेनगावात २४ हजार ३१ जणांना १.३४ लाख, वसमतला ३८ हजार ३०७ जणांना १.७२ लाख, कळमनुरीत २८ हजार १३७ जणांना १.५९ लाख, औंढ्यात २३ हजार ६४० जणांना १.३२ लाख पुस्तके वाटप केली होती. यापैकी ७५ टक्के पुस्तके विद्यार्थ्यांनी यंदा शाळेत जमा केली. जवळपास ५ लाख पुस्तके जमा झाली आहेत. ती यंदा पुन्हा विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आली. समग्र शिक्षा अभियानातील पुस्तकांची अजून प्रतीक्षाच आहे.
वर्गनिहाय विद्यार्थीसंख्या
पहिली २२८५२
दुसरी २३१८५
तिसरी २२११२
चौथी २१८७४
पाचवी २१३४२
सहावी २१०३४
सातवी २०७४०
आठवी २०५३५
२५ टक्के पुस्तके मिळालीच नाहीत
जिल्ह्यात शिक्षण विभागाच्या पुस्तके परत मागविण्याच्या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. यंदा कोरोनामुळे पुस्तके लवकर मिळणार नाहीत, ही अडचण लक्षात घेता केलेले नियोजन कामी आले. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना याचा फायदा झाला. सध्या शाळेत ही पुस्तके विद्यार्थ्यांना वाटण्यात आल्याने ऑनलाईन वर्ग घेण्यात येत आहेत. काही मुलांना पुस्तके मिळाली नाहीत तर ती इतरांकडून तात्पुरती घेत आहेत.
मला शाळेतूनच पुस्तके मिळाल्याने त्याचा फायदा झाला. ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू झाला असून या पुस्तकांमधून अभ्यास करणे सोयीचे झाले आहे. काही मुलांना पुस्तके मिळाली नाहीत.
सचिन मोरे, विद्यार्थी
मला शाळेतून पुस्तके मिळाली नाहीत. त्यामुळे ऑनलाईन अभ्यास करायचा कसा? हा प्रश्न आहे. मागचे वर्षही कोरोनामुळे असेच गेले. यंदाही शाळा सुरू झाल्या नाहीत. शिवाय पुस्तकेही नाहीत.
राजू गवळी, विद्यार्थी
आपल्या जिल्ह्यात शिक्षकांनी मेहनत घेऊन जवळपास ७५ टक्के पुस्तके जमा केली आहेत. त्यामुळे ती विद्यार्थ्यांना वाटप केली. समग्र शिक्षातील पुस्तकेही लवकरच येणार आहेत.
संदीपकुमार सोनटक्के, शिक्षणाधिकारी