हिंगोली शहरात गतवर्षी पाऊस नसतानाही एका इमारतीच्या भिंतीचा भाग कोसळून दोन जण जखमी झाले होते. यंदा आता पावसाळ्याला प्रारंभ झाला आहे. अनेक इमारती धोकादायक असल्याने त्या कधी पडतील, याचा नेम नाही. मागील अनेक वर्षांपासून पालिका नोटीस देते, मात्र इमारतीला काही धोका झाला नाही म्हणून ती पाडण्यासाठी टाळाटाळ केली जात असल्याचे दिसून येत आहे. यात अनेकांनी आर्थिक अडचणीपोटी इमारत रिकामी करून इतरत्र वास्तव्य केले. मात्र ही इमारत पाडली नाही. तर काहींनी आता या इमारतीत भाडेकरू ठेवले. कमी रकमेत जागा मिळत असल्याने भाडेकरूही जीव धोक्यात घालून अशा ठिकाणी राहात असल्याचे दिसत आहे. तर काही ठिकाणी मालक स्वत: राहतात.
हिंगोली शहराजवळून वाहणाऱ्या कयाधू नदीच्या पूररेषेत मोडणाऱ्या ७६० घरांनाही नोटीस दिली आहे. यात महादेववाडी, बावणखोली, आजम कॉलनी, खाजा कॉलनी, शिवराजनगर भागातील अनेक घरे या पूररेषेच्या डेंजर झोनमध्ये आहेत. कयाधूला जास्त पूर आला की, या घरांना धोका संभवतो. या नागरिकांनाही दरवर्षी नोटिसा दिल्यानंतरही त्यांच्यावर काही फरक पडत नाही.
ज्या इमारतीला नोटीस दिली ती भावाची आहे. त्याचा धोकादायक भाग उतरवून घेतला आहे. ती पूर्ण पाडायला सांगितली आहे. भाऊ किंवा कोणीच तेथे राहात नाही.
-मोहन रोडे, हेमराज गल्ली
आम्ही राहातो तो भाग सुरक्षित वाटतो. मात्र समोरच्या भागात गळती आहे. वरचा मजला मोडकळीस आला आहे. भाड्याने राहात होतो. मात्र आता इतरत्र जाण्याची तयारी सुरू आहे.
एच.व्ही. गवई, काप्रतवार कॉलनी
आमच्या इमारतीचा धोकादायक भाग तेवढा उतरवून घेतला. इतरत्र कुठे जाणार? आहे तो भाग सुरक्षित आहे. तर यंदा बाजूचे बांधकाम होत असून आम्हीही डागडुजी करणार आहोत.
रजनीश तिवारी, जुने शहर
धोकादायक इमारती १३५
इमारतींत राहणाऱ्यांची संख्या २५०
वारंवार दिल्या नोटिसा
याबाबत उपमुख्याधिकारी उमेश हेंबाडे म्हणाले, नगरपालिकेकडून वारंवार नोटिसा दिल्या जातात. यंदाही १३५ घरमालकांना नोटिसा दिल्या आहेत. दुर्घटना घडल्यास घरमालक जबाबदार राहील, असे स्पष्टपणे म्हटले आहे.
इमारत पडल्यास जबाबदार कोण?
गेल्यावर्षी चांगला पावसाळा झाल्याने मोठ्या शहरात अनेक दुर्घटना घडल्या. दुर्दैवाने हिंगोलीत असा प्रकार घडल्यावर याला जबाबदार कोण? हा प्रश्न आहे. पालिकेने नोटिसा देऊन स्पष्टपणे आपली बाजू बळकट करून ठेवली आहे.