हिंगोली : खोटे मृत्यू प्रमाणपत्र तयार करून तीन कोटी रुपयांची मालमत्ता परस्पर नावावर करून घेतल्याप्रकरणी महसूलच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसह इतर सात जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
हिंगोली शहरातील गणेशवाडी तिरुपतीनगर सर्व्हे ११ व १२ प्लॉट नं.२ व ३ परस्पर नावावर करून घेतल्याची तक्रार वकीलीची पदवी घेत असलेल्या ऐश्वर्या सीताराम भाकरे या तरुणीने हिंगोली शहर पोलिसांत दाखल केली आहे. तक्रारीत म्हटले की, वडील डॉ. सीताराम सखाराम भाकरे व भाऊ डॉ. स्वप्नील सीताराम भाकरे यांची मी, माझी दुसरी आई वंदना सीताराम भाकरे व लहान बहीण आराध्या सीताराम भाकरे असे कायदेशीर वारस असतानासुद्धा बनावट मृत्यूपत्र तयार केले. डॉ. स्वप्नील व डॉ.सीताराम यांना कोणताही कायदेशीर वारस नसल्याचे विधान करून मृत्यूपत्र व इसार पावत्यामध्ये करून नोटरी केली. यात माझ्या आई-वडिलांच्या नावावर असलेली गणेशवाडी सर्व्हे नं.१४ येथील प्लॉट क्रमांक २,३ मधील अंदाजे ३ हजार ९३२ चौरस मीटर व ३ कोटी रुपये किमतीची जमीन आरोपींनी नावे करून घेतली. त्यांना ग्रामविकास अधिकारी बाभूळगाव यांनी बनावट मृत्यूदाखला दिला. तर महसूलमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांना हाताशी धरून ही मालमत्ता संबंधितांनी नावावर करून घेतली.
यामध्ये नांदेड येथील अॅड. शेख झियोउद्दीन, हिंगोलीतील मतीन पठाण यांच्याशी संगणमत करून बाभूळगाव येथील शिवाजी महादराव गायकवाड, आझम कॉलनीतील शेख अखिल शेख खलील, संतोष श्रीराम भिसे, कपडा गल्लीतील कन्हैय्या सत्यनारायण खंडेलवाल, बाभूळगावचा ग्रामविकास अधिकारी तसेच महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांवर हिंगोली शहर पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.या प्रकरणात एका पुढाऱ्याचा भाऊ, वकील, पत्रकार, ग्रामविकास व महसूलच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल झाल्याने ही बाब चर्चेचा विषय बनली आहे.