- इस्माईल जाहगीरदारवसमत (हिंगोली): पूर्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी रविवारी ८०.५६ टक्के मतदान झाले. यानंतर मंगळवारी सकाळी आठ वाजता शहरातील जुने तहसिल कार्यालय परिसरात असलेल्या धान्य गोडाऊन मध्ये मतमोजणीस सुरुवात होणार आहे. निवडणुकीत दोन्ही पॅनल मध्ये अटीतटीचा सामना पहावयास मिळाला. पूर्णा साखर कारखान्यावर पुन्हा दांडेगावकर यांचे वर्चस्व राहणार की परीवर्तन होणार ? या निकालाकडे नांदेड, परभणी व हिंगोली या जिल्ह्यांचे लक्ष लागले आहे. टोकाई निवडणुकीत ऊस गाळपास नेला जात नाही, हा मुद्दा गाजला होता. पूर्णा कारखान्याचे निवडणुकीतही काही प्रमाणात का होईना उसाचा मुद्दा गाजलेला पाहायला मिळाला.
वसमत येथील पूर्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी ९ जुलै रोजी मतदान झाले. निवडणुकीत माजीमंत्री जयप्रकाश दांडेगावकर व आमदार राजू नवघरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास पॅनल तर त्यांचे प्रतिस्पर्धी उज्वला तांभाळे व डॉ. जयप्रकाश मुंदडा यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास परीवर्तन पॅनल तसेच कॉंग्रेस नेते अ. हफीज अ. रहेमान यांनी ६ अपक्ष उमेदवार यांना एकत्रित करून तिसरे पॅनल निवडणुकीत उभे केले होते. २१ जागांसाठी ४८ उमेदवार निवडणुक रिंगणात उतरले आहेत. रविवारी सकाळी ८ ते ४ वाजेदरम्यान २१ हजार ५२० मतदारांपैकी १७ हजार ३३६ मतदार यांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची टक्केवारी कमी होणार असे चित्र असताना दुपारपासून मतदानाचा आकडा वाढला. शेवटी ८०.५६ टक्के मतदान झाले.
मतदान प्रक्रियेवर निवडणूक निर्णय अधिकारी विकास देशमुख, तहसीलदार शारदा दळवी, किशोर धुतमल, अनिल पाटील यांची नजर होती. एकूण ४४१ कर्मचाऱ्यांनी मतदान प्रक्रिया पूर्ण केली. मतदानाच्या पेट्या जुने तहसील परिसरातील धान्य गोडाऊन येथे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्या.११ जुलै रोजी सकाळी ८ वाजेदरम्यान मतमोजणीस सुरुवात होणार आहे. मतदान मोजणी प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत चालणार असल्याचे संकेत आहेत.
प्रचार आरोप प्रत्यारोपाने निवडणूक गाजली...पूर्णा निवडणुकीत बाराशिव कारखान्यासह हक्काचा कारखाना ऊस गाळपास नेत नसल्याचा मुद्दा चांगलाच गाजला. ऊस उत्पादक शेतकरी सभासद मतदार यांनी उमेदवारां समोर ऊस गाळपास नेल्या जात नसल्याचे प्रश्न पोटतिडकीने मांडला.
मतमोजणी केंद्रावर तगडा पोलीस बंदोबस्त.....११ जुलै रोजी सकाळी ८ वा शहरातील जुने तहसिल परिसरात असलेल्या धान्य गोडाऊनमध्ये मतमोजणी केंद्रावर मतमोजणीस सुरुवात होणार आहे. त्यासाठी मतमोजणी केंद्रावरील सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उपविभागीय पोलिस अधिकारी संदिपान शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि चंद्रशेखर कदम यांच्या सह सपोनि पांडुरंग बोधणापोड, फौजदार राहुल महीपाळे यांच्यासह आदिंनी बंदोबस्त तैनात केला आहे.