हिंगोली जिल्ह्यात मागच्या वर्षी लोकसहभाग अथवा वित्त आयोगातून अंगणवाड्यांची रंगरंगोटी करण्यात आली होती. आता ग्रामपंचायतींना महिला व बालकल्याणसाठी खर्च करायच्या दहा टक्के निधीतून गॅस सिलिंडर उपलब्ध करून द्यायचे आहेत. यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी सर्व गटविकास अधिकाऱ्यांना पत्र दिले आहे.
जिल्ह्यात यंदा अंगणवाड्यांना गॅस सिलिंडर उपलब्ध करून देण्याच्या मोहिमेला प्रारंभ झाला. यामध्ये ८५ अंगणवाड्यांमध्ये आधीच सिलिंडर उपलब्ध होते. त्यात हिंगोलीतील ३४ व सेनगाव तालुक्यातील ५१ अंगणवाड्यांचा समावेश आहे. नव्याने २१६ अंगणवाड्यांना ग्रामपंचायतींनी सिलिंडर उपलब्ध करून दिले आहे. पुढच्या वेळी गॅस सिलिंडर भरून आणण्यासाठी अंगणवाडी मदतनीसांना मिळणाऱ्या इंधन भत्त्यातून तरतूद करावी लागणार आहे.
सध्या कोरोनामुळे अंगणवाड्या बंद आहेत. मात्र घरपोच पोषण आहार शिधा वाटप केले जात आहे. रोज पाच विद्यार्थ्यांना याचे वाटप करून त्यांचे वजन घेणे, लसीकरण करणे व आरोग्य तपासण्या करणे ही कामे केली जात आहेत, अशी माहिती महिला व बालकल्याणचे उपमुकाअ गणेश वाघ यांनी दिली.
तालुका अंगणवाड्या धूरमुक्त
हिंगोली १८९ ३६
सेनगाव २२५ ५९
वसमत २२५ १९
कळमनुरी १०७ २२
आखाडा बाळापूर १४५ ३०
औंढा ना. २०४ १३५