हिंगोली : येथील भुसार व्यापाऱ्यांचा शेतीमाल खरेदी करून ३.१३ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अकोला येथील चार व्यापाऱ्यांवर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात ३१ मे रोजी गुन्हा नोंद झाला. ही फसवणूक ३१ जानेवारी ते १३ मार्च २०२३ या काळात झाली.
हिंगोलीतील तापडीया इस्टेट येथील लक्ष्मीनारायण मुंदडा व त्यांचे वडील दामोधर मुंदडा यांचे एनटीसी भागात भुसार दुकान आहे. या दुकानात शेतमाल खरेदी केला जातो. ३१ जानेवारी ते १३ मार्च २०२३ या काळात दामोधर मुंडदा यांच्या दुकानातून १ कोटी ५० लाख ८८ हजार ३८२ रूपये किमतीचा तर लक्ष्मीनारायण मुंदडा यांच्या दुकानातून १ कोटी ६२ लाख ६८ हजार ३४१ रूपये किमतीचा असा एकूण ३ कोटी १३ लाख ५६ हजार ७२३ रूपये किमतीचा सोयाबीन, चना, तूर शेतमाल अकोला येथील चार व्यापाऱ्यांनी खरेदी केला. व्यापारी नियमाप्रमाणे एक महिन्याच्या आत शेतमालाची रक्कम देण्याचे ठरलेले असताना त्यांनी सदर शेतीमालाची रक्कम एक महिन्यात दिली नाही. मुंदडा यांनी सदर रकमेबाबत अकोला येथील व्यापाऱ्यांकडे पाठपुरावा केला. मात्र प्रत्येक वेळी त्यांच्याकडून टाळाटाळ केली जाऊ लागली होती.
यात आपली फसवणुक झाल्याचे लक्षात येताच लक्ष्मीनारायण मुंदडा यांनी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी लक्ष्मीनारायण मुंदडा यांच्या फिर्यादीवरून मनिष विजयकुमार कोटेचा (जैन) (रा. अकोला), मोहिनी आशिष दोरकर, आशिष दोरकर ( दोघे रा. एमआयडीसी नं. ३, अकोला), शैलेश उद्योग गोडावूनचे मालक नरेंद्र भाला (रा. एमआयडीसी २, अकोला) यांचे विरुध्द गुन्हा नोंद झाला. पोलिस निरीक्षक डॉ. एन. बी. काशीकर तपास करीत आहेत.