लोकमत न्यूज नेटवर्ककळमनुरी : तालुक्यातील आखाडा बाळापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या ३ जानेवारी रोजी शेवटच्या दिवशी २७ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले असून सध्या ३३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.निवडणूक लढविणाऱ्या अंतीम उमेदवारांची यादी व चिन्ह वाटप ४ जानेवारी रोजी तहसील कार्यालयाच्या दालनात सकाळी ११ वाजता होणार आहे. एकूण ७४ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यात तिघांचे उमेदवाराकडे जातवैधता प्रमाणपत्र नसल्याने त्यांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात आले. २८ डिसेंबर रोजी एका उमेदवाराने दोन जानेवारी रोजी ५ जणांनी तर ३ जानेवारी रोजी २७ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. १८ संचालकांच्या जागेसाठी ३३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. १३ जानेवारी रोजी सकाळी ७.३० ते ५.३० वाजेच्या दरम्यान ७६ मतदान केंद्रावर मतपत्रिकेद्वारे मतदान होणार आहे. आखाडा बाळापूर बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात १२० गावे आहेत. तर ५१ हजार ८१ मतदार आहेत. हमाल- १, व्यापारी-२ व शेतकरी-१५ अशा एकूण १८ संचालकासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. १४ जानेवारी रोजी तहसील कार्यालयात मतमोजणी होणार आहे. ३ जानेवारी रोजी अभिजित देशमुख, शिवाजी चव्हाण, अमर सावंत, पंजाबराव पतंगे, काशीराव पतंगे, रवि कोकरे, रुपेश वडगावकर, राहुल पतंगे, ओम कदम, संतोष राजेगोरे, सविता गावंडे, अनूसया नरवाडे, शेख आकफुन्नीसा, सुमनबाई वीर, राधाबाई अडकिणे, शिवाजी सवंडकर, धनाजी पवार, सुनील लांडे, एकनाथ पुंड, उल्हास जाधव, सोमनाथ रणखांब, गजानन काळे, मंदाबाई लोंढे, कुसुमबाई लोंढे, छायाबाई शेळके, खोब्राजी भुक्तर, मारोतराव शिंदे या २७ उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली.आखाडा बाळापूर येथील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक रिंगणात सध्या ३३ उमेदवार आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रशांत खेडेकर, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार कैलास वाघमारे, सहाय्यक निबंधक बोलके हे काम पाहत आहेत.
कृऊ बास निवडणुकीत ३३ उमेदवार रिंगणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2019 12:46 AM