लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महावितरणच्या वतीने प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना अर्थात ‘सौभाग्य’ योजनेच्या माध्यमातून ज्या गावामध्ये ८० टक्क्यांपेक्षा जास्त दलित वस्ती आहे मात्र त्यांच्या घरामध्ये अदयाप वीज पोहोचलेली नाही अशा हिंगोली जिल्ह्यातील ३४९ कुटुंबियांना महावितरणने मोफत वीज जोडणी देऊन अंधारातली गावे प्रकाशमान केली आहेत.ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील तुप्पा, सिंदेफळ, कौडगाव, देवठाणा व कलगाव या पाच गावांचा समावेश करण्यात आला आहे. या गावांमध्ये शंभर टक्के विद्युतीकरण करण्यासाठी गाव निहाय शिबिरांचे आयोजन करून अद्याप विविध कारणास्तव वीज जोडणी पासून वंचित राहिलेल्या अनुसूचित जातीतील २१०, अनुसूचित जमातीतील १७ व इतर १२२ अशा एकूण ३४९ कुटुंबियांना सौभाग्यच्या माध्यमातून वीज जोडणी देण्यात आली आहे. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबियांना विनामूल्य तर इतर गरिब कुटुंबियांना ५० रूपये प्रतिमहिना याप्रमाणे केवळ पाचशे रूपयात वीज जोडणी देण्यात आली. यामध्ये कळमनुरी तालुक्यातील तुप्पा गावामध्ये ८२ सेनगाव तालुक्यातील सिंदेफळ गावात ४३, वसमत तालुक्यातील कौडगाव मधील ७५ कुटुंबियांना तर हिंगोली तालुक्यातील देवठाणा येथे ८० तसेच कलगाव मधील ६९ कुटूंबियांना वीज जोडणी देण्यात आली आहे. संबंधित उपविभागीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सर्व वीज जोडण्या पूर्ण होतील अशा पध्दतीने काम करावे. अधिकृत वीज जोडणी ही स्वमालकीची व प्रतिष्ठेची भावना असल्याने ग्रामस्थांनीही वीज जोडणी करून घ्यावी.ग्राम स्वराज्य अभियान राबवूनही वीजचोरी करणाºयांवर वीज कायद्यान्वये कठोर कारवाई करण्यात येणार आहे. मागील दोन ते तीन महिन्याच्या कालावधीत विविध ठिकाणच्या न्यायालयांनी वीज चोरांना दोन वर्षाच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे सदर योजनेचा फायदा घेऊनअधिकृत वीज जोडणी करून घेण्याचे आवाहन महावितरण नांदेड परिमंडळाचे प्रभारी मुख्य अभियंता आजिनाथ सोनवणे, हिंगोली मंडळाचे अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव यांनी केले आहे.सदरील अभियानाच्या माध्यमातून अद्याप पर्यंत वीज जोडणी नसलेल्या ग्रामस्थांनी महावितरणच्या शाखा कार्यालय अथवा उपविभागीय कार्यालयाशी संपर्क साधून वीज जोडणी करून घेण्याचे आवाहन केले.
३४९ कुटुंबियांना मोफत वीजजोडणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 12:32 AM