हिंगोली : कृषी विभागात नोकरी लावतो म्हणून दोघांना बनावट नियुक्ती आदेश देत ३४ लाख रूपयांची फसवणूक करण्यात आली.याप्रकरणी तिघांविरूद्ध हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात २३ मे रोजी गुन्हा नोंद झाला.
सचिन मधूकर चेके (रा. मंगरूळपीर ता. वाशिम), अरूण श्रीराम ठाकरे (रा. इरळा ता. मालेगाव ह.मु. कन्हेरगाव नाका), गोवर्धन गावंडे (रा. कन्हेरगाव नाका ता. हिंगोली) अशी भामट्यांची नावे आहेत. या तिघांनी गजानन तुकाराम गायकवाड (रा. अंतुलेनगर बळसोंड, हिंगोली) यांच्याशी संपर्क साधला. गायकवाड यांच्या पुतणीला व एका नातेवाईकाच्या पत्नीला कृषी विभागात नोकरी लावतो म्हणून तिघांनी अमिष दाखविले. त्यानंतर १ एप्रिल २०२१ ते ९ जून २०२१ या काळात गायकवाड यांच्या पुतणीच्या नोकरीसाठी २१ लाख तर नातेवाईकाच्या पत्नीच्या नोकरीसाठी १३ लाख असे एकूण ३४ लाख रूपये घेतले.
काही दिवसांतच नियुक्तीपत्रे मिळतील असे सांगितले. त्यानुसार काही दिवसांनी त्यांना नियुक्ती पत्र दिले. मात्र हे नियुक्तीपत्र बनावट असल्याचे उघडकीस आले. यात फसवणूक झाल्याने गायकवाड यांनी हिंगोली ग्रामीण पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. यात तिघांविरूद्ध गुन्हा नोंद झाला. पोलिस निरीक्षक शिवाजी गुरमे, उपनिरीक्षक मुपडे तपास करीत आहेत. दरम्यान, यात आणखी काही जणांची फसवणूक झाली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यादृष्टिने पोलिस तपास करीत आहेत.