हिंगोली : गत दीड वर्षापासून सर्व जग कोरोना महामारीमुळे त्रस्त आहे, तर दुसरीकडे वाढत्या तापमानामुळे बाहेर आलेल्या सापांना कोणी मारू नये या चिंतेत सर्पमित्र आहेत. गत तीन महिन्यांमध्ये सर्पमित्रांनी ३५ सापांना पकडून जिल्ह्यातील पाणथळ व कोरड्या जागी नेऊन सोडले आहे.
उन्हाळा आणि पावसाळा या आठ महिन्यांमध्ये गर्मी तसेच उंदीर, बेडकांमुळे साप बाहेर येत असतात. सापांना माणसांंच्या हालचाली कळत असतात. स्वत:चा जीव वाचविण्याकरिता साप चावतो. विनाकारण साप कधीच चावत नाही, असा विश्वास सर्पमित्रांना आहे.
साप निघाल्याची माहिती दिल्यास आम्ही त्या ठिकाणी धावून जातो. २०२१ मध्ये फेब्रुवारी, मार्च, एप्रिल या तीन महिन्यांमध्ये जवळपास ३५ साप पकडून जंगलात नेऊन सोडले आहेत. यामध्ये दिवड व धामण, कवड्या, गवत्या, डुरक्या, तस्कर, धुळधामीळ या ३२ बिनविषारी सापांचा समावेश होता. तर विषारी सापांमध्ये नाग, आग्यापरोड, मनियार यांचा समावेश आहे. तीन महिन्यात शहरातील जिजामातानगर, अकोला बायपास, आदर्श महाविद्यालय परिसर आदी भागातून सर्पमित्र मुरली कल्याणकर, ओम जाधव यांना बोलावणे आले होते. लगेच त्यांनी त्या ठिकाणी धाव घेऊन सापांना पकडून योग्य ठिकाणी जंगलात नेऊन सोडले.
सापांना मारू नये...
साप सहसा उंदीर, बेडूक तसेच गर्मीमुळे बाहेर येतात. पावसाळ्यात बेडूक आणि उन्हाळ्यात उंदीर जास्त प्रमाणात बाहेर येतात. त्यांना खाण्यासाठी साप बाहेर येतात. पण काही नागरिक साप दिसताच त्याला मारून टाकतात. असे न करता सर्पमित्रांना बोलावणे हिताचे ठरेल व सापांचा जीव वाचेल.
- मुरली कल्याणकर, सर्पमित्र, हिंगोली
फोटो नंबर १