हिंगोली : येथील बळसोंड भागातील पंढरपूरनगरातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ४ लाख १२ हजार रूपये किमतीचा २० किलो ६०० ग्रॅम गांजा पकडला. ही कारवाई ५ जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास केली. या प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी अवैध धंदे व गुन्हेगारांविरूद्ध कारवाईची कडक भूमिका घेतली आहे. गस्तीसाठी पथकेही नियुक्त केली आहेत. ४ जानेवारी रोजी रात्री स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे यांचे पथक गस्तीवर होते. हे पथक मध्यरात्रीनंतर बळसोंड भागातील पंढरपूर नगरात गस्त घालत होते. या वेळी या भागातील परसराम मस्के याने त्याचे घरात गांजाची साठवणूक केली असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यावरून पथकाने छापा टाकला असता आतमध्ये नायलॉन रंगाच्या पांढऱ्या पोत्यामध्ये ४ लाख १२ हजार रूपये किमतीचा २० किलो ६०० ग्रॅम गांजा आढळून आला.
पोलिसांनी गांजा व एक दुचाकी असा एकूण ४ लाख ७२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक घेवारे यांच्या फिर्यादीवरून परसराम सुभाषराव मस्के (रा. पार्डा, ह.मु. पंढरपूर नगर बळसोंड), रवी रूस्तूमराव पोले (रा. रिसाला बाजार हिंगोली) याचेविरूद्ध गुन्हा नोंद झाला. ही कारवाई पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, पोलिस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, पोलिस अंमलदार गजानन पोकळे, पारू कुडमेथे, राजू ठाकूर, नरेंद्र साळवे, आकाश टापरे, आजम प्यारेवाले, नितीन गोरे, प्रशांत वाघमारे यांच्या पथकाने केली.