हिंगोली : उच्चदाब वितरण प्रणालीअंतर्गत कृषी पंपांसाठी जिल्ह्यातील पाच तालुक्यांत ४ हजार २६ वीज जोडण्या दिल्या असून, विद्युत रोहित्रे ३ हजार ९२४ बसविण्यात आली असल्याची माहिती महावितरण कंपनीच्यावतीने देण्यात आली.
२०१८-१९ व आतापर्यंत जिल्ह्यातील पाचही तालुक्यांत वीज जोडल्या दिल्या आहेत. यामध्ये औंढा येथे ३५७ (वीज रोहित्रे ३२९), कळमनुरी ५७८ (वीज रोहित्रे ५३६), हिंगोली ९१२ (वीज रोहित्रे ८९६), वसमत ६६३ (वीज रोहित्रे ६७०), सेनगाव १५१६ (वीज रोहित्रे १४७९) या तालुक्यांचा समावेश आहे.
मार्च २०२० पासून वीज ग्राहकांकडे चालू थकबाकी मोठ्या प्रमाणात बाकी आहे. यामध्ये औंढा तालुक्यात १२ कोटी २१ लाख रुपये, वसमत तालुक्यात १६ कोटी १९ लाख रुपये, हिंगोली तालुक्यात १५ कोटी १५ लाख रुपये, कळमनुरी तालुक्यात १० कोटी ९१ लाख रुपये, तर सेनगाव तालुक्यात १४ कोटी २४ लाख रुपये चालू थकबाकी आहे.
वीज ग्राहकांनी वीज बिल वेळेवर भरावे
जिल्ह्यातील हिंगोली, वसमत, कळमनुरी, औंढा आणि सेनगाव तालुक्यांत मिळून विजेची चालू थकबाकी ६८ कोटी ७० लाख रुपये आहे. जिल्ह्यातील वीज ग्राहकांनी वीज वापरल्यानंतर त्याचे बिल कारण न सांगता महावितरणकडे भरून रितसर पावती घ्यावी.
- सुधाकर जाधव, अधीक्षक अभियंता, हिंगोली