लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : गरोदरमाता, बालमृत्यूच्या वाढत्या संख्येत घट व्हावी या उद्देशाने यावर्षीपासून ‘प्रधानमंत्री मातृवंदना’ योजना सुरू केली आहे. सुदृढ व निरोगी बालक जन्माला यावे, या उद्देशाने सुरू केलेली योजना प्रभाविपणे राबविण्याच्या सूचना असून योजनेअंतर्गत जिल्ह्यात ४ हजार १४ गरोदर मातांना अर्थसहाय्य करण्यात आले आहे.दारिद्र्य रेषेखालील व दारिद्र्य रेषेवरील गरोदर मातांना गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत मजुरी करावी लागते. प्रसूतीनंतरही शारीरिक क्षमता नसतानाही मजुरी करावी लागते. त्यामुळे गरोदरमाता कुपोषित राहून नवजात बालकावरही परिणाम होतो. त्यामुळे ‘प्रधानमंत्री मातृवंदना’ योजना अंमलात आणली आहे. लाभासाठी गरोदर मातांची नावनोंदणी करणे अनिवार्य आहे. मातृवंदना योजनेमध्ये केंद्र शासनाचा ६० तर ४० टक्के राज्य शासनाचा सहभाग आहे. लभार्थी महिलेस एकूण तीन टप्प्यांत योजनेची रक्कम बँक खात्यावर जमा केली जात आहे. प्रथम टप्प्यात १ हजार, द्वितीय २ हजार आणि तिसरा २ हजार असा एकूण ५ हजार रूपये रक्कमेचा लाभ दिला जातो. यात लाभार्थ्यांना दिलेल्या लाभाची रक्कम एकूण १ कोटी ५ लाख १८ हजार रूपये ४ हजार १४ मातांच्या बँक खात्यात जमा केल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. गरोदर माता व बालमृत्यू थांबविणे हा योजना उद्देश आहे.दारिद्र्य रेषेखालील व दारिद्र्य रेषेवरील लाभार्थ्यांचा समावेश योजनेत असला तरी वेतनासह मातृत्व रजा मिळविणाऱ्यांना योजनेचा लाभ दिला जाणार नाही. तसेच सदर योजने अंतर्गत पहिल्या अपत्यासाठी व शासनाने अधिसूचित केलेल्या संस्थेत नोंदणी झालेल्या महिलांना लागू आहे. तसेच लाभाची ५ हजार रुपये रक्कम तीन टप्प्यांत संबंधित लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा केली जाते. नैसर्गिक गर्भपात झाल्यास किंवा मृत बालक जन्मल्यास त्या टप्प्यापुरताच लाभ एकदाच देण्याची तरतूद आहे.सासरकडील आधार कार्ड आवश्यक..प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या लाभासाठी लाभार्थी महिलेचे आधार कार्ड सासरच्या नावे असणे बंधनकारक आहे. त्यामुळे माहेरकडील आधार कार्डमधील नाव बदलवून घेतल्यास सदर योजनेचा लाभ घेताना अडचणी येणार नाहीत. शिवाय लाभार्थ्याच्या खात्यावर थेट लाभाची रक्कम जमा करणे शक्य होईल. त्यामुळे गरोदर मातांनी आधार कार्डमधील नावात बदल करून घेण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांनी केले आहे. विशेष म्हणजे अनेक बँका झीरो बजेटवर गरोदर मातांचे खाते उघडण्यास नकार देत आहेत. त्यामुळे बँकेत खाते उघडताना लाभार्थ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
४ हजार गरोदर मातांना ‘मातृवंदनेचा’ लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2018 12:57 AM