हिंगोली : महावितरणच्या कुरुंदा शाखा १ उपविभागात कार्यरत वरिष्ठ तंत्रज्ञास चार हजारांची लाच घेताना पकडल्याने त्याच्यावर निलंबनाची कारवाई १६ एप्रिल रोजी करण्यात आली आहे.
कुरुंदा येथील महावितरणचा वरिष्ठ तंत्रज्ञ लक्ष्मीकांत बिजलगावे यास गावातीलच अंकुश दळवी यांच्याकडून चार हजारांची लाच घेताना पकडले होते. दळवी यांच्या वडिलांच्या नावे प्रधानमंत्रे सोलार कृषी पंप योजनेतून ऑनलाइन कोटेशन व सर्व्हे करून देण्याच्या कामात सहकार्य करण्यासाठी बिजलगावेने सहा हजारांची लाच मागितली होती. शेवटी चार हजारांवर तडजोड झाली. ती रक्कम स्वीकारल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने कुरुंदा पोलिसांत तक्रार नोंदविण्यात आली होती.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून या कर्मचाऱ्यावर कारवाई झाल्याने निलंबनाचा प्रस्ताव महावितरणचे नांदेड येथील मुख्य अभियंता यांच्याकडे पाठविला होता. त्याला मंजुरी मिळाली आहे. गुन्हा दाखल झाल्याची तारीख ४ एप्रिलपासून निलंबित केल्याचे आदेश काढल्याचे कार्यकारी अभियंता अमोल मोरे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला कळविले आहे.