लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : मानव विकास कार्यक्रम अंतर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व दारिद्र्य रेषेखालील गरोदर मातांना प्रसूती काळात बुडित मजुरी दिली जाते. हिंगोली जिल्ह्यातील ४१८० लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर ४ हजार रूपयांप्रमाणे रक्कम जमा करण्यात आली आहे.जिल्ह्याचा मानव विकास निर्देशाक उंचाविण्याकरिता शासनाने मानव विकास कार्यक्रमाची स्थापना केली आहे. हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, सेनगाव आणि औंढा नागनाथ या तीन तालुक्यांचा यात समावेश आहे. प्रसूतीदरम्यान गरोदर मातांना आवश्यक आरोग्य सेवा मिळावी. तसेच प्रसूतीदरम्यान गरोदर मातांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेता यावी, या उद्देशाने मानव विकास कार्यक्रम अंतर्गत आरोग्य विभागातर्फे मातांना बुडित मजुरी दिली जाते. तसेच प्रसूतीदरम्यान मातांची मोफत आरोग्य तपासणी, औषधोपचार व आवश्यक वैद्यकीय सुविधा पुरविल्या जातात. मानव विकासकडून संबंधित तालुक्यांना लाभार्थी मातांची रक्कम जिल्हा आरोग्य खात्याकडे वर्ग करण्यात आली. त्यानुसार आरोग्य विभागाने सदर रक्कम लाभार्थीमातांच्या खात्यावर जमा केल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. ४१८० मातांचा यात समावेश असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राहुल गिते यांनी सांगितले. मानव विकास कार्यक्रमांतर्गत दिली जाणारी रक्कम थेट बँक खात्यावर जमा करण्यात येते. त्यामुळे लाभार्थ्यांचे बँकेत खाते असणे आवश्यक आहेत. बीपीएल कार्डधारक, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती या प्रवर्गातील गरोदर मातांना मानव विकास कार्यक्रम अंतर्गत लाभाची रक्कम दिली जाते. ज्या लाभार्थ्यांचे यादीत नाव असूनही त्यांना सदर योजनेचा लाभ मिळाला नसेल, तर थेट जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.जिल्ह्यातील मानव विकास कार्यक्रम यात समाविष्ट सेनगाव हिंगोली व औंढानागनाथ येथील लाभार्थ्यांचा समावेश आहे. यामध्ये हिंगोली तालुक्यात एकूण १ हजार ५५० गरोदर मातांसाठी ६२ लाख रूपये रक्कम लाभार्थी मातांच्या बँक खात्यावर प्रत्येकी ४ हजार रूपये प्रमाणेजमा करण्यात आली. तर सेनगाव तालुक्यातील १ हजार २८० मातांची ५१.२० लाख रूपये रक्कम जमा केली आहे. औंढा नागनाथ तालुक्यातील १ हजार ३५० गरोदर मातांच्या खात्यावर ५४ लाख जमा केल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.जिल्हा आरोग्य यंत्रणेकडे उपलब्ध झालेल्या यादीनुसार जिल्ह्यातील एकूण ४१८० गरोदर मातांना बुडित मजुरीचा लाभ मानव विकास कार्यक्रम अंतर्गत देण्यात आला आहे.
४१८० मातांना बुडित मजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 12:15 AM