लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्हा रूग्णालयात मागील तीन वर्षांत २१ जणांनी नेत्रदान केले असून त्यामुळे आतापर्यंत ४२ अंध व्यक्तींना दृष्टी मिळाली आहे. तर मागील दोन वर्षात १३६० जणांनी नेत्रदान संकल्प केला आहे.१० जून हा दिवस डॉ. भालचंद्र यांचा स्मृतिदिन दृष्टिदीन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त नेत्रदानाविषयी जनजागृती सप्ताह राबविला जातो. त्या अनुषंगाने जिल्हा रूग्णालय तर्फे दृष्टिदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.१० ते १६ जून या दरम्यान राबविण्यात येणाऱ्या सप्ताहात नेत्रदान संदर्भात जनजागृती केली जाणार आहे. नेत्रदानामुळे अंध व्यक्तींना जग पाहण्याची संधी मिळते. त्यामुळे नेत्रदान सर्वश्रेष्ठ दान यासंदर्भात शालेय विद्यार्थी, सार्वजनिक ठिकाणी यासह कार्यक्रमांचे आयोजन करून मार्गदर्शन करण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ. गोपाल कदम यांनी दिली. नेत्रदानामुळे एखाद्या अंध व्यक्तीचे जीवन प्रकाशमान होऊ शकते. त्यामुळे समाजात याबाबत अधिक जनजागृती होणे तितकेच गरजेचे आहे.नेत्रदानासाठी पुढाकार घ्यावा-कदमनेत्रदान हे सर्वश्रेष्ठ दान असून या कार्यात सर्वांनी सहभागी होऊन पुढाकार घ्यावा. सध्या मोबाईलचा वापर खूप होत आहे. लहान मुलेही मोबाईल हाताळत आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस बालकांत नेत्रविकाराचे प्रमाण वाढत आहे. शिवाय मोबाईलच्या अतिवापरामुळे लहान मुलांच्या चष्म्याचे नंबरही वाढत आहेत. याकडे पालकांनी लक्ष देणे गरजेचे आहे. नेत्रदान जनजागृती सप्ताहात नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. सोनाली गोपाल कदम यांनी केले.नेत्रपेढीची गरज४ देशभरात लाखो जण बुबुळाच्या विकाराने ग्रस्त आहेत. त्यामुळे अनेक तरूणांचे भवितव्य अंधारात सापडले आहे. इतर देशात अपघातातील मृत व्यक्तींची बुबुळे काढून घेण्याची परवानगी आहे. त्यामुळे भारतातही असा कायदा पारित झाल्यास अनेक अंध व्यक्तींना दृष्टी मिळेल. तसेच प्रत्येक जिल्हा रूग्णालयात सुसज्ज नेत्रपेढी व नेत्रतज्ज्ञ असावेत.-नेत्ररोगततज्ज्ञ डॉ. किशन लखमावार
नेत्रदानामुळे ४२ जणांना मिळाली दृष्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 12:44 AM