हिंगोली : सामाजिक न्याय विभागाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या रमाई आवास योजनेअंतर्गंत २०२६-१७ ते २०२०-२१ या वर्षात जिल्ह्याला ६ हजार ७६६ घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यातील ४ हजार २८२ लाभार्थींनी घरकुलाचे काम पूर्ण केले असून, त्यांना हक्काचा निवारा मिळाला आहे.
अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील नागरिकांचे जीवनमान उंचावणे व त्यांना हक्काचा निवारा उपलब्ध व्हावा, यासाठी सामाजिक न्याय विभागाच्यावतीने रमाई आवास योजनेंतर्गत घरकुल उपलब्ध करून दिले जाते. जिल्ह्यात आतापर्यंत २०२६-१७ ते २०२०-२१ या वर्षात ६ हजार ७६६ घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत योजनेला बळकटी दिली जात आहे. त्याअंतर्गंत या योजनेतील लाभार्थींना अनुदानही मंजूर केले जाते. अधिकारी, कर्मचाऱ्यांचा पाठपुरावा यामुळे जिल्ह्यातील लाभार्थींना ६०६० घरकुले मंजूर झाली. यातील ५ हजार ३६९ लाभार्थींना घरकुलाचा पहिला हप्ता देण्यात आला. तसेच ४ हजार ५९४ जणांना दुसरा, ४ हजार २२७ जणांना तिसरा, तर २ हजार ४०० जणांना चौथा हप्ता देण्यात आला आहे. यातील ४ हजार २८४ घरकुले पूर्ण झाली असून, या लाभार्थींचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण झाले आहे.
२४८२ लाभार्थींना घरकुल पूर्ण होण्याची प्रतीक्षा
जिल्ह्यातील २ हजार ४८२ लाभार्थींच्या घरकुलाची कामे अपूर्ण आहेत. यातील काहीजणांना पहिला, तर काहीजणांना घरकुल बांधकामाचा दुसरा हप्ता देण्यात आला आहे. मात्र बांधकामासाठी वाळू मिळत नसल्याने अनेक लाभार्थींनी घराचे बांधकाम थांबविले होते.
जिल्ह्यातील पूर्ण झालेली घरकुले
तालुका उद्दिष्ट पूर्ण झालेली घरकुले
औंढा नागनाथ ८५६ ५३९
वसमत १२९२ ८८१
हिंगोली १५११ ८८७
कळमनुरी १७०१ १११४
सेनगाव १४०६ ८६३
एकूण ६७६६ ४२८४