लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्हा परिषद आरोग्य विभाग अंतर्गत जिल्ह्यातील गरोदरमातांना प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेत, योजना कार्यान्वीतपासून ते ६ नोव्हेंबर अखेर एकूण ५९४१ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे.सदृढ व निरोगी बालक जन्माला यावे, तसेच गरोदरमाता व बालमृत्यूच्या वाढत्या संख्येत घट व्हावी यासाठी सदर योजना प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना आहेत. केंद्र सरकारने प्रधानमंत्री मातृ वदंना योजना १ जानेवारी २०१७ पासून देशात लागू केली आहे. योजनेअंतर्गत पहिल्या खेपेच्या गर्भवती मातांना लाभ तिन टप्प्यात त्यांच्या बँक खात्यात थेट जमा केला जातो. पहिला लाभ १००० रुपये १५० दिवसांच्या आत गरोदर पणाची नोंदणी झाल्यानंतर, तर दुसरा हप्ता हा २ हजार रुपये गरोदरपणाची पहिली तपासणी केल्यानंतर (१८० दिवस ) तिसरा हप्ता २ हजार रुपये प्रसूत झाल्यानंतर व बाळाचे १४ आठवड्यापर्यंत लसीकरण झाल्यावर देण्यात येते. असे एकुण ५ हजार रुपये लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येतात. हा लाभ पहिल्या खेपेच्या गरोदर माताना गरोदर राहिल्यावर त्यांची १५० दिवसांच्या आत केल्यावर व त्यासोबत आधार कार्ड व पतीचे बँक खाते पासबुक असल्यावर देण्यात येतो. याप्रकारे जिल्ह्यात आतापर्यंत ५९४१ गरोदर मातांना लाभ देण्यात आला आहे. योजनेच्या लाभासाठी महिलांचे बँकखाते आधारलिंक असणे गरजेच आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच जिल्हा रूग्णालयातील प्रसूतीचे प्रमाण वाढावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्या अनुषंगाने विविध योजना राबविण्यात येत असून आता माता व बालमृत्यू थांबविण्यासाठी प्रधानमंत्री मातृ वंदना योजना राबविली जात आहे.केंद्र शासनाच्य महिला व बालविकास मंत्रालयाने ‘प्रधानमंत्री मातृ वंदना’ योजना सुरू केली आहे. योजनेच्या लाभासाठी गरोदर मातांची शासकीय रूग्णालय किंवा शासनमान्य खासगी रूग्णालयात नाव नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे. लाभार्थी मातेस एकूण तीन टप्यांत योजनेची रक्कम बँक खात्यावर जमा करण्यात येत आहे. जास्तीत जास्त गरोदर मातांनी नांव नोंदणी करावी तसेच प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांनी केले आहे.
५९४१ मातांना मातृवंदना योजनेचा लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2018 12:58 AM