- इस्माईल जाहगिरदारवसमत (हिंगोली): घरकुलाचा तिसरा हप्ता बँकेत टाकण्यासाठी लाच मागणारा पंचायत समिती वसमतचा कंत्राटी अभियंता लाचलुचपत विभागाच्या सापळ्यात अडकला. एसीबी पथकाने अभियंत्यास पाच हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले. ही कारवाई शुक्रवारी रात्री ११ वाजता पंचायत समिती कार्यालय परिसरात करण्यात आली.
तक्रारदार हा वसमत तालुक्यातील बोरगाव ( बुद्रुक) येथील रहिवासी आहे. त्यास रमाई घरकुल योजनेअंतर्गत घर मिळाले आहे. काही दिवसांपासून तिसऱ्या हप्त्याचे पैसे थकले होते. यादरम्यान ग्रामीण अभियंता राजेश बालाजी नाईक याने तक्रारदारास तुम्ही चिंता करू नका, असे म्हणत वेळ मारून नेली. दरम्यान, पैसे थकले असले तरी मी यात काहीतरी तोडगा काढतो. पण मला पाच हजार रुपये द्यावे लागतील, अशी मागणी केली. यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली.
शहानिशा करून लाच लुचपत विभागाच्या पथकाने पंचायत समिती परिसरात शुक्रवारी रात्री सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराने अभियंतेच्या हातात पाच हजार रुपये ठेवले. त्याच दरम्यान लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यास ताब्यात घेतले. ही कारवाई लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधीक्षक अनिल कटके, रामेश्वर पंचलिंगे, गजानन पवार, गोविंद शिंदे, राजाराम फुपाटे आदींनी केली.
कोणालाही पैसे देऊ नका..सरकारी काम नियमानुसार आणि मोफत होते, यासाठी अधिकारी अथवा खाजगी व्यक्ती पैसे मागत असेल तर कुठलीही भीती न बाळगता लाच लुचपत विभागाकडे याची तक्रार करा.- अनिल कटके, उपअधीक्षक, हिंगोली.