रमेश वाबळे, हिंगोली : देशात दुसऱ्या क्रमांकाचा दसरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंगोलीच्या ऐतिहासीक दसरा महोत्सवात विजयादशमीच्या दिवशी शनिवारी रात्री १०:४१ वाजता फटाक्यांच्या नेत्रदीपक आतषबाजीत ५१ फूटी रावणाच्या पुतळ्याचे दहण करण्यात आले.
१७० वर्षांची परंपरा लाभलेल्या येथील ऐतिहासीक दसरा महोत्सवाचे आयोजन सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या वतीने घटस्थापनेपासून रामलीला मैदानावर करण्यात आले. दसऱ्याच्या दिवशी रामलीला मंचवर कलावंतांनी रामायणातील प्रभूश्रीराम व रावणातील युद्धप्रसंग सादर केला. त्यानंतर दसरा महोत्सवाचे खास आकर्षण असलेल्या रावणदहनाचा कार्यक्रम रात्री १०:४१ वाजेच्या सुमारास घेण्यात आला. यादरम्यान सुमारे पंधरा ते वीस मिनिटे फटाक्यांची नेत्रदीपक आतषबाजी करण्यात आली. कार्यक्रमास जिल्हाधिकारी अभिनव गोयल, पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे, श्री १०८ महंत कौशल्यदास महाराज, तहसीलदार श्रीकांत भुजबळ, माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण, मुख्याधिकारी अरविंद मुंढे, विलास गोरे, चंद्रकांत लव्हाळे, साहेबराव बांगर,ॲड. विजय निळकंठे, प्रविण टाले, विश्वास नायक, गणेश बांगर, अनिकेत लव्हाळे यांच्यासह प्रशासकीय अधिकारी, नागरिकांची हजारोंच्या संख्येने उपस्थिती होती.
रामलीला मैदान गर्दीने फुलले...विजयादशमीच्या दिवशी दसरा महोत्सवात शहरांसह ग्रामीण भागातील नागरिकांनी हजारोंच्या संख्येने रामलीला मैदानावर गर्दी केली होती. कृषी व औद्योगिक प्रदर्शनीतील गगणचुंबी आकाशपाळणे, ब्रेकडान्ससह विविध मनोरंजनाच्या साहित्याचा नागरिकांनी आनंद घेतला. रात्री नागरिकांच्या गर्दीने रामलीला मैदान फुलल्याचे पहायला मिळाले.