कुरुंदा : येथे नवीन कारभाऱ्यांच्या हाती सूत्र येण्याअगोदर गावाच्या विकासासाठी १५व्या वित्त आयोगातून ५१ लाख रुपयांचा निधी दोन टप्प्यात मंजूर झाला आहे. तसेच घनकचरा, सांडपाणी व्यवस्थापनमध्येही कुरुंद्याचा समावेश असल्याने एक ते दीड वर्षाच्या कार्यकाळात बंदिस्त नाली, कचऱ्याची विल्हेवाट हे प्रश्नही मार्गी लागणार आहेत.
सरपंचपदाच्या सोडतीनंतर फेब्रुवारी महिन्यात सरपंच व उपसरपंच पदाची निवड होईल. त्यानंतर गावाला कारभारी मिळेल. सरपंच निवडीनंतर पहिल्या मासिक बैठकीत या कामांचा आराखडा निश्चित होईल. त्याचबरोबर गावातील घनकचरा, सांडपाणी व्यवस्थापनामध्ये समावेश असल्याने या कामासाठी लवकरच निधी उपलब्ध होणार आहे. एक ते दीड वर्षाच्या कार्यकाळात अनेक भागातील बंदिस्त नालीचे प्रश्न व गावातील कचऱ्यांची विल्हेवाट लावण्यासाठी व्यवस्थापन करण्यात येणार आहे. त्यामुळे गावाच्या विकासात भर पडेल. गावातील रस्ते, नाली व पथदिवे आदी समस्या सोडविण्यासाठी नवनिर्वाचित सदस्यांना प्रयत्न करावे लागणार आहेत. कुरुंदा येथे १५व्या वित्त आयोगमधून ५१ लाख रुपये, तर गावाचा घनकचरा, सांडपाणी व्यवस्थापनात समावेश असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी कोकरे यांनी दिली.