ऑनलाईन लोकमत
हिंगोली, दि. १२ : वसमत तालुक्यातील आसेगांव येथील प्राचीन जैन मंदिरातील ६ पितळी मुर्त्यांची चोरी झाल्याचे आज सकाळी उघडकीस आले आहे. या सहा मूर्त्यांमध्ये पार्श्वनाथ दिगम्बर भगवान व भगवान मल्लीनाथ यांच्या मुर्त्यांचा समावेश आहे. याप्रकरणी वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
आसेगाव येथे जवळपास १००० वर्ष जुने चिंतामणि पार्श्वनाथ दिगम्बर जैन मन्दिर आहे. मंदिराच्या स्थापनेपासून मंदिरात काही पुरातन मुर्त्या आहेत. यातील काही चांदी व पितळेच्या मुर्त्या मंदिरातील कपाटात ठेवलेल्या होत्या. रात्री चोरांनी पुजारी कुलभूषण मिरकुटे यांच्या खोलीस बाहेरून कडी लावली व मंदिराच्या खिडकीचे ग्रील तोडून मंदिरात प्रवेश केला. यानंतर कपाट उघडून चोरट्यांनी सहा मुर्त्यांची चोरी केली. या मुर्त्या वेळोवेळी झालेल्या पंचकल्याण कार्यक्रमात भक्तांनी दान स्वरुपात दिलेल्या आहेत. यावेळी कपाटातील चांदीच्या मुर्त्या सुरक्षित असून केवळ पितळेच्याच मुर्त्या चोरी झाल्याची तक्रार पुजारी मिरकुटे यांनी वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे. यावरून गुन्हा दाखल करून पुढील तपास सपोनी अशोक जाधव करत आहेत.