लोकमत न्यूज नेटवर्ककळमनुरी : जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदली प्रक्रियेला प्रारंभ झाला असून बदलीपोर्टल ५ जून रोजी रात्री ७ वाजता सुरू झाले आहे. जिल्ह्यात यावर्षी ६0१ शिक्षक बदलीपात्र असल्याची माहिती उपशिक्षणाधिकारी राजेश पातळे यांनी दिली.बदलीपोर्टल सुरू करणारे हिंगोली जिल्हा राज्यात तिसरा ठरला आहे. जिल्ह्यातील ६४ मुख्याध्यापक पदवीधर शिक्षक ७० तर ४६२ प्राथमिक शिक्षक बदलीस पात्र ठरले आहेत. या शिक्षकांच्या सेवाज्येष्ठता याद्या लावण्यात आल्या आहेत. संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षकांच्या बदल्या होणार आहेत. शिक्षक संवर्ग एक, संवर्ग-२, संवर्ग-३ व संवर्ग- ४ च्या शिक्षकांना बदलीसाठी २० गावे निवडण्याकरीता बदलीपोर्टल सुरू झाले आहे.१० जूनपर्यंत शिक्षकांना हे बदलीपोर्टल सुरू राहणार आहे. १० जूनपर्यंत सर्व बदलीपात्र शिक्षकांनी बदलीसाठी आॅनलाईन २० गावे भरावीत, असे आवाहनही शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. १० जूननंतर कोणतीही मुदत मिळणार नाही.सर्वसाधारण क्षेत्रात १० वर्षे व एकाच शाळेवर सलग ३ वर्षे सेवा झालेले शिक्षक बदलीस पात्र ठरले आहेत. अवघड क्षेत्रात ३ वर्षे सेवा झालेले शिक्षकही बदलीस पात्र राहणार आहेत. बदलीसाठी आॅनलाईन अर्ज भरण्याची लगबग सुरू झाली आहे. बदलीची रॅन्डम राऊंडपद्धत शासनाने बंद केली आहे. मागील वर्षी रॅन्डम राऊंडने बदली झालेल्या शिक्षकांचे बदलीचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. मागील वर्षी रॅन्डम राऊंडने बदली झालेल्या शिक्षकांना सीईओंकडे अर्ज करता येणार आहे. मागील वर्षी ८० टक्के शिक्षकांच्या बदल्या झालेल्या आहेत.शिक्षक संवर्ग एकमध्ये ५ आजारांची वाढ केलेली आहे. पती-पत्नी एकत्रीकरणांतर्गत जो जोडीदार सेवा ज्येष्ठ आहे. अशाच शिक्षकांची बदलीसाठी सेवा ग्राह्य धरल्या जाणार आहे. दोघांचीही सेवा कालावधी समान असेल तर एकालाच बदली अर्ज करता येणार आहे. जिल्हांतर्गत बदलीसाठी पात्र शिक्षक अर्ज भरण्यासाठी नेट कॅफेवर दिसत आहेत.
६०१ शिक्षक ठरले बदलीपात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2019 12:45 AM