हिंगोली : जिल्ह्यात वन्य प्राण्यांकडून झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून मागील तीन वर्षांत शेतकऱ्यांना ३ कोटी रुपयांची भरपाई प्रदान केली आहे. यात वन्य प्राण्यांकडून झालेल्या हल्ल्यातील जखमी, मृत झाल्यास वारसांना, पीकहानी व पशुहानीबाबत दिलेल्या मदतीचा समावेश आहे. हे हल्ले दिवसेंदिवस वाढत चाले आहेत.
२0१७-१८ मध्ये माणसांवर हल्ल्याच्या १५ घटना घडल्या होत्या. यात १२ लाख ९७ हजार ९५९ रुपयांची भरपाई दिली. २0१८-१९ मध्ये ३४ हल्ले झाले होते. यात १७.६९ लाखांची मदत दिली. तर चालू आर्थिक वर्षात १३ हल्ल्यांतील नुकसानग्रस्तांना ४.८८ लाखांची मदत दिली. पीकहानीची प्रकरणेही तीन वर्षांत ६१८ एवढी निकाली निघाली. यात २0१७-१८ मध्ये ९६ प्रकरणांत २.९१ लाख, २0१८-१९ मध्ये ४0२ प्रकरणांत ११.७६ लाख तर चालू आर्थिक वर्षात १२0 प्रकरणांत २.२५ लाखांची भरपाई वाटप करण्यात आली आहे. पशुधन हानीच्या एकूण ७१ प्रकरणांत १0 लाखांची भरपाई दिली. यात २0१७-१८ मध्ये २२ प्रकरणांत २.४२ लाख, २0१८-१९ मध्ये ३७ प्रकरणांत ४.0८ लाख तर चालू आर्थिक वर्षातील १२ प्रकरणांत ३.५२ लाखांची मदत प्रदान केली आहे.
वन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या सर्व प्रकारच्या हानीपासून बचावासाठी उपायही वन विभागाकडून आखले जात आहेत. जंगलाशेजारील गावात अथवा शेतात वन्यप्राणी येवू नये यासाठी गुरे प्रतिबंधक चर खोदकाम करण्यात आले आहे. यात २0 किमीची चर खोदल्याचे वन विभागाच्या अहवालात म्हटले. तर वन्य प्राण्यांना जंगलातच पाणी उपलब्ध होण्यासाठी १२२ वनतळी घेतली आहेत. खोल सलग समतल चराचे ५0८ गट निर्माण केले. याशिवाय माती नाला बांधांची १८२ कामे, अनघड दगडी बांधांची १४२ तर सिमेंट नाला बांधांची १५ कामे घेऊन जंगलवाढीस पोषक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्नही केला.
३३ ठिकाणी टँकरचे पाणीजंगलात वन्य प्राण्यांसाठी नैसर्गिक जलसाठे उपलब्ध असतीलच, असे नाही. वन विभागाने केलेल्या सर्वेक्षणानुसार ३४ ठिकाणी नैसर्गिक जलस्त्रोतावर वन्यप्राण्यांची तहान भागते, असे सांगण्यात येते. मात्र कृत्रिम स्त्रोतांची संख्याही ३३ आहे. या ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असल्याचे सांगितले जाते. अनेकदा याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे हे पाणवठे कोरडे पडतात. मात्र त्यात कायम पाणी उपलब्ध राहील, याकडे वन विभागाचा कटाक्ष असतो, असे सांगण्यात आले.
हिंगोली जिल्ह्यात तीन तरसांचे वास्तव्यवन विभागाकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणात वन्य जैवविविधतेची माहिती गोळा करण्यात आली होती. यात ११ प्रकारचे १३५३ वन्य प्राणी असल्याचे आढळून आले होते. मात्र यातील काही वन्य प्राण्यांची संख्या जास्त असण्याची शक्यता आहे.यात तरस ३, रानमांजर ६, मोर १२७, काळवीट २१, भेंडकी १0, चितळ ८१, नीलगायी ६२७, वानरे ८६, कोल्हा ३0, रानडुक्कर ३२३, ससा व इतर ३0 अशी संख्या असल्याचे म्हटले आहे. तर जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र ४५२६ चौरस किमी असून यापैकी २९0.८१ चौ. किमीचे वनक्षेत्र आहे. हे वनक्षेत्र जिल्ह्यातील ७0८ पैकी १३६ गावांत विभागले आहे.