लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : हिंगोली महसूल विभागाने यंदा जानेवारीअखेर महसूल वसुलीचे उद्दिष्ट ६३.७५ टक्के पूर्ण केले आहे. यात २६.६१ पैकी १६.९६ कोटींची वसुली झाली असून हे प्रमाण ६३.७५ टक्के आहे.दरवर्षीप्रमाणे यंदाही गौण खनिज वसुलीत जिल्हा मागे आहे. जमीन महसुलाची ८७.४९ टक्के वसुली झाली. जमीन महसुलात हिंगोलीत १.८८ कोटींपैकी ५६.५५ लाख, सेनगावात ५७ लाखांपैकी १५.१५ लाख, वसमतला १.८४ कोटींपैकी ७८.३१ लाख, औंढा नागनाथला ५७ लाखांपैकी ३२.0५ लाख, कळमनुरीत ७५ लाखांपैकी ११.२४ लाखांची वसुली झाली आहे.गौण खनिजच्या महसुलाचे २१ कोटींचे उद्दिष्ट आहे. यात हिंगोलीत ५.३0 पैकी १.९२ कोटी, सेनगावात ३.५0 पैकी १.४५ कोटी, वसमतला ५.0५ पैकी ३.0७ कोटी, औंढा नागनाथमध्ये ३.६५ पैकी १.५८ कोटी, कळमनुरीत १.६६ पैकी ४७ लाखांची वसुली झाली आहे. तर जिल्हाधिकारी कार्यालयाने जमीन महसुलात ३७ लाख व गौण खनिजामध्ये २.३६ कोटींची वसुली केली आहे. आकड्यांच्या भाषेत सांगायचे तर सर्वाधिक ११.२५ कोटींचे उद्दिष्ट हिंगोली उपविभागाला आहे. तर वसुली ४.0९ कोटी आहे. हे प्रमाण ३६.४१ टक्के आहे. वसमत उपविभागाला ११.११ कोटींचे उद्दिष्ट व वसुली ५.७५ कोटींची आहे. हे प्रमाण ५१.८२ टक्के आहे. कळमनुरी उपविभागाला ४.२५ कोटींचे उद्दिष्ट व वसुली ४१.७५ कोटींची आहे. हिंगोली उपविभाग सर्वांत मागे दिसत आहे.यंदा राष्ट्रीय महामार्गांच्या कामामुळे मोठा महसूल मिळाला असला तरीही यातही मध्यंतरी अवैध गौण खनिज उत्खननाच्या तक्रारी होत्या. तर वाळू घाट लिलाव न झाल्याने या महसुलापासून सलग दुसऱ्या वर्षी जिल्ह्याला मोठा फटका सोसावा लागला आहे. तरीही गतवर्षी उद्दिष्ट गाठण्यात यश आले होते. यंदाही शासकीय कामांच्या भरवशावर शेवटच्या टप्प्यात महसूल विभाग उद्दिष्ट गाठेल, असे चित्र आहे. मात्र आगामी दीड महिन्यात वसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे.हिंगोली जिल्ह्यात अवैध वाळूउपसा व गौण खनिज उत्खनन मागील अनेक दिवसांपासून सुरूच आहे. यातील काही प्रकरणांत प्रशासनाने लक्ष घातले होते. मात्र या कारवायांना तेवढ्यापुरतेच स्वरुप मिळाल्याने पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती झाली आहे. वसमतमध्ये तर वाळूची खुलेआम वाहतूक होत असल्याचे चित्र आहे. आता लिलावच नसल्याने हिंगोली, कळमनुरी, सेनगावातही हेच चित्र आहे. तलाठ्यावरील हल्ल्यापूर्वी आक्रमक असलेला औंढा तालुकाही आता थंड पडला आहे. विशेष म्हणजे काही कंत्राटदारांनी गौण खनिज उत्खनन करूनही प्रशासनास हुलकावणी दिल्याचे प्रकार घडल्याचे दबक्या आवाजात चर्चिले जात आहे.
महसूलने गाठले ६३ टक्के उद्दिष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2019 12:34 AM