लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्हा कुष्ठरोगमुक्त करण्यासाठी आरोग्य विभागातर्फे कुष्ठरोग शोधमोहीम अभियान २४ सप्टेंबर ते ९ आॅक्टोबरदरम्यान राबविण्यात आले. जिल्ह्यात यापूर्वी एकूण ६८ कुष्ठरोग रूग्णांवर उपचार सुरू होते. त्यात आता भर पडली असून शोध मोहिमेत ४१ जणांना कुष्ठरोग असल्याचे निष्पन्न झाले असून हे रूग्ण आता उपचाराखाली आहेत.कुष्ठरोग अनुवंशिक नाही, किंवा पूर्वजन्माचे पापही नाही. कुष्ठरोगाबाबत अनेक गैरससमजूती आहेत. त्या दूर होणे गरजेचे आहे. बहुविध औषधोपचारांनी कोणताही कुष्ठ रोग सहा महिने ते वर्षभरात बरा होतो. कुष्ठरोग शोध अभियान २०१८-१९ अंतर्गत आरोग्य प्रशासनातर्फे त्वचारोग तपासणी मोहीम राबविण्यात आली. सदर मोहिमेअंतर्गत गाव पातळीवरील कुटुंबातील सदस्यांची आरोग्य विभागाच्या टीमद्वारे त्वचारोग तपासणी करण्यात आली. कुष्ठरोग व त्वचेचे इतर आजारांची तपासणी केल्यानंतर लवकर निदान व उपचारासाठी गावपातळीवर सूक्ष्म नियोजन कृती आराखडा तयार करण्यात आला होता. आशा व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या टीमद्वारे दरदिवशी घरोघरी जाऊन तपासणी करण्यात आली. एकूण ९ लाख ४९ हजार ६९५ जणांची शोध अभियानाद्वारे तपासणी करण्यात आल्याची माहिती आरोग्य यंत्रणेकडून देण्यात आली. दरम्यान त्वचारोग असलेले ६ हजार ४१४ संशयित रूग्ण आढळुन आले. त्यापैकी ४१ जणांना कुष्ठरोग असल्याचे निष्पन्न झाले असून यामध्ये २ बालरूग्णांचा समावेश आहे. ४१ रूग्णांपैकी २० संसर्गित तर २१ असंर्गित रूग्ण आहेत. या रूग्णांना औषधोपचार दिले जात आहेत. सदर मोहीम यशस्वीपणे राबविण्यासंदर्भात जिल्हाधिकारी अनिल भंडारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी एच. पी. तुम्मोड यांनी वैद्यकीय अधिकारी व कर्मचाºयांना सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने कुष्ठरोग शोध मोहीम जिल्ह्यात राबविण्यात आली, अशी माहिती सहाय्यक संचालक डॉ. राहुल गिते यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.पथक : कुष्ठरोग शोध अभियानजिल्हाभरात शोध मोहिम अभियान राबविण्यात आले. ४१ जणांना कुष्ठरोग असल्याचे या मोहिमे अंतर्गत निष्पन्न झाले असले तरी संबधित रूग्ण आता उपचाराखाली आहेत. इतर त्वचारोगाचे आजार असलेल्या रूग्णांनाही औषधोपचार करण्यात आल्याची माहिती आरोग्य पथकाने दिली.अभियानाद्वारे जनजागृती व तपासणी आरोग्य विभागाच्या पथकाद्वारे करण्यात आली. यामध्ये आशा व आरोग्य कर्मचाºयांचा समावेश होता. जिल्हास्तरावरून वाय. एस. लहानकर, एस. एम. बुरकुले, पी. एस. जटाळे, यशोदीप सोमवंशी, आर. बी. भालेराव आदींनी काम पाहिले.कुष्ठरोग बहुविध औषधोपचाराने बरा होतो...४त्वचा तेलकट व जाडसर असणे, हातापयांना मुंग्या, बधिरता व कारडेपणा तसेच फिक्कट किंवा लालसर रंगाचा त्वचेवरील चट्टा ही कुष्ठरोगाची लक्षणे आहेत. शारीरिक विकृती टाळण्यासाठी कुष्ठरोगाच्या प्राथमिक अवस्थेत तपासणी करून घेणे आवश्यक आहे. शासकीय, निमशासकी, नगरपालिका, ग्रामीण रूग्णालय प्राथमिक आरोग्य केंद्रात याबाबत दरदिवशी तपासणी करून रूग्णांना मोफत औषधोपचार केले जातात. पाठीवरील चट्टे दिसत नाहीत. त्यामुळे कुटुंबातील प्रत्येकांनी तपासणी करून निदान करून घेण्याचे आवाहन डॉ. राहूल गिते यांनी केले आहे.
६४१४ संशयित रूग्णांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 12:22 AM