लोकमत न्यूज नेटवर्कआखाडा बाळापूर : कांडली फाटा येथे बस अडवून दगडफेक करत बसच्या काचा फोडल्या. बसमध्ये पत्रकेही फेकून आरोपी फरार झाले. हा हल्ला आदिवासी पँथर संघटनेतर्फे करण्यात आल्याचे ठाणेदार व्यंकट केंद्रे यांनी सांगितले. यातील सात आरोपींना अटक करण्यात आली, असून आरोपींना जामीन मंजूर झाला आहे.आखाडा बाळापूर जवळील कांडली फाटा येथे २४ एप्रिल रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास अकोला-नांदेड जाणाऱ्या बसला १० ते १५ जणांनी संगनमत करून घोषणाबाजी करत झेंडे दाखवून अडविले. यावेळी या जमावाने बसवर दगडफेक करत लोखंडी पाईपने काचाही फोडल्या. आदिवासी मुलीवरील अत्याचार विरोधातील पत्रके बसमध्ये फेकून जमाव पसार झाला. सदर प्रकरणाचा पोलिसांनी कसून शोध केला असता हा हल्ला आदिवासी पँथर संघटनेकडून करण्यात आल्याचे ठाणेदार व्यकंट केंद्रे यांनी सांगितले. अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ हे कृत्य केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. गजानन निवृत्ती कोठुळे (रा. भोसी), नागोराव गोविंदराव पिंपरे, दत्तराव विठ्ठलराव गुहाडे, केशव सीताराम गारोळे, एकनाथ ग्यानोजी शेळके, (रा. राजवाडी ता. वसमत) तसेच विठ्ठल तुळशीराम उगले (रा. वाघजाळी ता. सेनगाव), हरी शिवप्रसाद पिंपरे (रा. राजवाडी) या सात जणांना पोलिसांनी अटक केली. आरोपींना सेनगाव न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपींचा जामीन मंजूर केल्याचे पोनि केंद्रे यांनी सांगितले. यातील अद्याप आठ आरोपी फरार असून पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.हल्ल्यात दोन बोलेरो जीप वापरण्यात आला असून एका जीपचा क्रमांकही पोलिसांना देण्यात आला.
दगडफेक करणारे ७ आरोपी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 12:48 AM