हिंगोली : सुराणा नगरातील दरोडा प्रकरणी हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ११ मार्च राजी पहाटे जालना येथे धरपकड मोहीम राबवून ७ संशयितांना ताब्यात घेतले. अन्य चौघांचा शोध सुरु आहे. यामुळे गुन्हा उघडकीस येणार असल्याचे पोलीस विभागाच्या सुत्रांनी सांगितले.
हिंगोली शहरालगत असलेल्या सुराणा नगरात राज्य राखीव दलाचे जवान आर. व्ही. त्रिमुखे यांच्या घरी १२ ते १३ दरोडेखोरांनी ७ मार्चला दरोडा टाकला. यामध्ये घरातील महिला व पुरुषांच्या गळ्यावर तलवार ठेऊन दरोडेखोरांनी सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा सव्वा दोन लाख रुपयांचा ऐवज लांबविला होता. याप्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनास्थळावर कुठलाही पुरावा नसतांना दरोडेखोरांना पकडण्याचे पोलिसांसमोर माेठे आव्हान उभे होते. दरम्यान, पोलीस अधिक्षक राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधिक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलीस अधिक्षक यतीश देशमुख, उपाधिक्षक विवेकानंद वाखारे यांनी तपास पथके स्थापन केली. पोलीस अधिक्षक कलासागर यांनी हिंगोली ग्रामीण पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेला संयुक्तपणे तपास करून सायबर सेलची मदत घेण्याच्या सुचनाही दिल्या.
त्यानुसार गुन्हे शाखेचे निरीक्षक उदय खंडेराय, सहाय्यक पोलीस निरीक्षक बळीराम बंदखडके, उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, किशोर पोटे यांच्या पथकाने चार दिवसांपासून मराठवाड्यासह विदर्भात संशयीतांची चौकशी सुरु केली. या प्रकरणात जालना येथील काही जण सहभागी असल्याची माहिती मिळाल्यावरून हे पथक जालना येथे पोहोचले. दरम्यान, ११ मार्च राेजी पहाटे अडीच वाजल्यापासून पोलिसांच्या पथकाने जालना पोलिसांच्या मदतीने विविध ठिकाणी छापे टाकून ७ संशयीतांना ताब्यात घेतले. तर अन्य चौघांचा अद्यापही शोध सुरु आहे. ताब्यात घेतलेल्या संशयीतांच्या घरझडती करण्यात आली.
या सर्वांना हिंगोली येथे आणल्यानंतर त्यांची सखोल चौकशी केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्या चौकशीतून गुुन्ह्याला वाचा फुटण्यास मदत होणार आहे. हिंगोलीत दरोडा टाकल्यानंतर फरार झालेल्या त्या संशयीत दरोडेखाेरांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या मोबाईलची तपासणी केली. त्यांच्या व्हॉटस्अपवर हिंगोलीच्या दरोड्याच्या बातम्या दिसून आल्या. त्यांनी या बातम्या एकमेकांना शेअर केल्याचे प्राथमिक तपासणीत आढळून आले आहे.