जवळा बाजार (जि. हिंगोली) : येथील परिहार परिवाराचा जुना लाकडीवाडा असलेल्या घरासह देशी दारूच्या गोदामाला २४ ऑक्टोबर रोजी रात्री दहा ते साडे दहाच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, हा वाडा १९५० सालचा असल्याची माहिती आहे. संपूर्ण वाडा जळून खाक झाला असून त्यातून नेसत्या वस्त्रानिशी बाहेर पडलेल्या ८ कुटुंबांकडे आता काहीच शिल्लक नाही.
जवळा बाजार येथील लक्ष्मण परिहार लोधी यांच्यासह त्यांच्या भावांचा मोठा परिवार एका जुन्या लाकडी वाड्यात राहतो. हा वाडा पूर्ण लाकडी जोडणीचा आहे. मात्र, या वाड्यात अंदाजे सहा ते सात जणांचे कुटुंब राहतात. त्यामुळे कुटुंबातील सदस्य संख्या ७० ते ८०च्या आसपास आहे. सोमवारी रात्रीच्या सुमारास एका खोलीतून धूर निघाला. यानंतर सदरील वाड्याला आगीने वेढले. काही क्षणातच आगीने रौद्ररूप धरण केले. शेजाऱ्यांनी क्षणाचाही विलंब न करता वाड्यातील महिला, पुरुष व बालकांना तत्काळ बाहेर काढले. मात्र, नगदी रक्कम सोने - चांदीचे दागिने, संसारोपयोगी साहित्य, अन्नधान्य व इतर साहित्य जळून खाक झाले.
आगीने रौद्ररुप धारण केल्यामुळे अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले होते. औंढा नागनाथ, कळमनुरी व वसमत येथील अग्निशामक दलाच्या गाड्या तातडीने दाखल झाल्या. तरीही तब्बल दहा तास आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू होते. संसारोपयोगी सर्व साहित्य आगीत जळून खाक झाले. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांच्या अंगावर केवळ कपडेच राहिले आहेत. आगीत घरातील नगदी रक्कम, सोने-चांदी, अन्न धान्य, फ्रीज, एसी, कुलर कपाट आदींचा जळून कोळसा झाला. बाजुलाच त्यांचे देशी दारूचे दुकान आहे. दुकानाच्या गोदामाला आग लागून मोठ्या प्रमाणात देशी दारूच्या बाटल्याही जळून खाक झाल्या.
घटनेची माहिती कळताच सपोनि. गजानन बाराटे, पोलीस उपनिरीक्षक सतीश तावडे यांच्यासह पोलीस कर्मचारी, तलाठी घटनास्थळी दाखल झाले. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज कुटुंबातील सदस्यांनी व्यक्त केला. यामध्ये भारत परिहार, लक्ष्मण परिहार, आकाश परिहार, दिनेश परिहार, शिवप्रसाद परिहार, गणेश परिहार, मोहीत परिहार यांचे अंदाजे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेचा पंचनामा तलाठी धाडवे यांनी केला आहे. वृत्त लिहिपर्यंत पोलिसांत नोंद झाली नव्हती.