लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन येथे बेवारस म्हणून जमा करण्यात आलेल्या ७६ दुचाकींचा लिलाव २० एप्रिल रोजी पोलीस मुख्यालयी झाला. बेवारस वाहनांचा बोली पद्धतीने लिलाव करण्यात आला. १ लाख ४५ हजारांत दुचाकीचा लिलाव झाला असून यात जीएसटीची रक्कम २७ हजार एकूण १ लाख ७२ हजार रूपयांत सदर लिलावाची प्रक्रिया पार पडली.यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी राहूल मदणे, स्थागुशाचे पोनि मोराती थोरात तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी हजर होते. बेवारस वाहने लिलाव पद्धतीने दिली जातील, असे पोलीस प्रशासनातर्फे यापुर्वीच आवाहन करण्यात आले होते. सदरील बेवारस वाहने नागरिकांना पाहण्यासाठी पोलीस मुख्यालयी ठेवण्यात आली होती. १६ ते १९ एप्रिल दरम्यान ही वाहने बघण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली होती. २० एप्रिल रोजी बोली पद्धतीने लिलाव जाहिर झाला. जाहिर लिलावात वसमत, हिंगोली, कळमनुरी यासह विविध ठिकाणच्या २३ नागरिकांनी अनामत रक्कम जमा करून सहभाग नोंदविला होता. ७६ बेवारस दुचाकीची बोलीस प्रारंभ ७० हजारांपासून सुरूवात करण्यात आली. अखेर हिंगोली येथील शेख खाजा यांनी १ लाख ४५ हजार रूपयांत लिलाव जाहिर केला. यात जीएसटी २७ हजार रक्कम एकूण १ लाख ७२ हजार रूपयांत लिलाव प्रक्रिया पार पडली. यावेळी अनेकांनी बोली लावून लिलावात सहभाग घेतला होता. लिलाव प्रक्रियेत अटी व शर्ती पूर्ण केलेल्यांनाच सहभागी करून घेतले.
७६ बेवारस वाहनांचा लिलाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 12:51 AM