हिंगोली : जिल्ह्यात १३ ते २८ सप्टेंबर या कालावधीत जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने संयुक्त कृष्ठरोग, क्षयरोग व असांसर्गिक आजार रुग्णशोध जनजागृती अभियान राबवत आहोत. यात ७८१ संशयित आढळले असून उपचार सुरू केल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांनी दिली.जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी व समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांनी मुख्यालयी २४ तास राहावे व ग्रामीण भागातील जनतेला दर्जेदार आरोग्य सेवा सुविधा द्याव्यात अशा कडक सूचना जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एच.पी.तुम्मोड यांनी दिल्या होत्या. त्या अनुषंगाने जिल्हा आरोग्य विभागामार्फत मोहीम राबविली जात आहे.राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात हे अभियान १३ ते २८ सप्टेंबर दरम्यान राबविण्यात येत आहे. यामध्ये जिल्ह्यातील लोकसंख्या १० लाख ९९ हजार ४७६ असून घरे २ लाख ११ हजार १७२ आहेत. मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी आरोग्य विभागाच्या ११९५ शोध पथकाद्वारे ग्रामीण व शहरी भागात सर्वेक्षण करण्यात येत आहे. या कालावधीत रूग्णांची तपासणी करून घ्यावी, असे आवाहन केले जात आहे. मोहिमेदरम्यान आतापर्यंत जिल्ह्यातील १ लाख ९४ हजार १७० जणांची तपासणी करण्यात आली.यात संशयित ७८१ रुग्ण आढळून आले. त्यापैकी ४६८ जणांची तपासणी केली असता त्यांच्यामध्ये १ एमबी व २ पीबी असे रुग्ण मिळाले. या मोहिमेदरम्यान सर्वांनी सहकार्य करावे व घरी आलेल्या पथकाला आरोग्य विषयक आवश्यक माहिती द्यावी, असे आवाहन जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी अधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. राहुल गिते यांनी केले आहे.नागरिकांनी अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या आशा, अंगणवाडी सेविका, आरोग्य कार्यकर्ती यांच्याशी संपर्क साधावा. लक्षात ठेवा....लवकर निदान लवकर उपचार निरोगी ठेवा आपला परिवार अशी माहिती जनजागृती अभियान दरम्यान राबविली दिली जात आहे.अंगावरील फिकट लालसर चट्टा, चकाकणारी तेलकट त्वचा, अंगावरील गाठी, हाता-पायामध्ये बधिरता व शारीरिक विकृती ही कुष्ठरोगाची लक्षणे आहेत. दोन आठवड्यापासून अधिक कालावधीचा खोकला किंवा ताप, वजनात घट, भूक मंदावणे, मानेवर गाठ येणे ही क्षयरोगाची लक्षणे आहेत.जास्त वजन, जास्त कमरेचा घेर, बीडी, तंबाखू, सिगारेट व मादक द्रव्याचे सेवन, अनिमित व्यायाम तसेच परिवारातील सदस्याला उच्च रक्तदाब, मधुमेह हृदय आजाराचा इतिहास असल्यास व कर्करोग विषयक लक्षणे असल्यास त्यांनी वेळेत तपासणी करून औषधोपचार घ्यावेत.
७८१ संशयित कुष्ठरूग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 12:04 AM