लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : राज्यात ग्राम स्वराज अभियानांतर्गत १९२ गावांतील ८ हजार ८२० लाभार्थ्यांना वीज जोडणी देण्यात आली असून, निश्चित उद्दिष्टांची पूर्तता महावितरणने वेळेपुर्वीच केली. वेळीच उदिष्ट पुर्तता करून देशात राज्याने या अभियानात प्रथम स्थान मिळविले आहे. यामध्ये नांदेड जिल्ह्यातील २० गांवातील १२१७ तर हिंगोली जिल्ह्यातील पाच गांवातील ४८० कुटूंबांचा समावेश आहे.केंद्रीय उर्जा मंत्रालयाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल ते ५ मे २०१८ पर्यंत राज्यात 'ग्रामस्वराज अभियान' राबविण्यात येत आहे. या अभियानात 'सौभाग्य' योजनेतून राज्यातील ज्या १९२ गावात ८० टक्यांपेक्षा अधिक दलितवस्ती आहे व आर्थिकदृष्ट्या दुर्बल व दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांची संख्या अधिक आहे, अशा सर्व लाभार्थ्यांना १०० टक्के वीजजोडणी देण्याचे उदिष्ट होते. त्यानुसार राज्यातील २३ जिल्हयांतील १९२ गावात वीजजोडणी नसलेल्या सर्व लाभार्थ्यांना ५ मे २०१८ पर्यंत वीजजोडणी द्यावयाची होती. मात्र महावितरणने हे उद्दिष्ट १ मे लाच पुर्ण केले असून या १९२ गावातील ८ हजार ८२० लाभार्थ्यांना वीज जोडणी दिली. देशामध्ये सर्वप्रथम महावितरणने दिलेल्या उदिष्टांची पुर्तता केली आहे. नांदेड जिल्हयातील पिंपरी महिपाल,लोणी खु.,पांगरी, माकणी,मंजूळगा, मानसाखरगा, पांडुरणी, चाकूर, केरूर, रहाटी खु., शिवूर, लहयारी, डोरली, दिग्रस, रावणगाव तामसा, कर्णा, परातपूर, येसगी, अंबाडी, राऊतखेडा तसेच हिंगोली जिल्हयातील तुप्पा, सिंदेफळ, कौडगाव, देवठाणा व कलगाव या पाच गावांचा समावेश होता.महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक (प्रकल्प) दिनेशचंद्र साबू, कार्यकारी संचालक प्रसाद रेशमे तसेच मुख्यालयासह क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उदिष्ट पुर्ततेसाठी परिश्रम घेत राज्यातील ८ हजार ८२० लाभार्थ्यांना मागील १६ दिवसांत वीज जोडणी दिली. दुर्गम व संवेदनशील गडचिरोली जिल्हयातील ८, गोंदिया जिल्ह्यातील ३ गावांचा समावेश आहे. तसेच भंडारा, चंद्रपुर, वाशिम, यवतमाळ, नांदेड इत्यादी मागास जिल्हयातही वीजजोडणीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याची माहिती महावितरणने दिली.
८०५० कुटुंब ‘सौभाग्य’ योजनेतून प्रकाशमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2018 12:38 AM