लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांचे गेल्या अनेक वर्षांपासूनच भिजत घोंगडे आॅनलाईन प्रक्रियेत मार्गी लागताना दिसत आहे. मात्र हिंगोली जिल्ह्यातून बाहेर जाणारे १0७ शिक्षक असले तरीही येणाऱ्यांची संख्या ९६ असल्याचे सांगितले जात आहे. त्यातील ८३ जणांना आज कार्यमुक्त करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले.आंतरजिल्हा बदल्यांचे १0७ जणांचे शासनाने काढलेले आदेश धडकल्यानंतर हिंगोली जिल्ह्यात प्रक्रिया सुरू झाली. शिक्षण विभागाने आज अशांना कार्यमुक्त करण्याचा आदेश दिला होता. त्यापैकी कळमनुरीतील २१ व वसमतच्या ५ जणांना कार्यमुक्त केले. मात्र लातूर जिल्ह्यात जाणाºया २४ शिक्षकांना तांत्रिक अडचणींमुळे सोडू नये, असे सांगण्यात आले. लातूर जिल्ह्यात जाणाºया शिक्षकांबाबत शासनानेच आदेश देवून त्यांचा कार्यमुक्ती आदेश थांबविला आहे. हिंगोली जिल्ह्यात जवळपास ११ शिक्षक कमी आले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून आंतरजिल्हा बदल्या या प्रशासकीय कुरण बनल्या होत्या. पार मंत्रालयापर्यंत त्यासाठी खेटे घालावे लागत होते. हा प्रश्न आता निकाली लागला असला तरीही यामुळे भविष्यात समतोल बिघाडीचा प्रश्न निर्माण होण्याची भीती वर्तविली जात आहे. काही भागांत शिक्षक येण्यासच तयार होत नाहीत. तर अशा मागास भागातील शिक्षक परजिल्ह्यात असतील, याची काही शाश्वती नाही. त्यामुळे अशा जिल्ह्यांमध्ये अचानक रिक्त पदांचा पूर येण्याची भीती आहे. आता एकट्या सेनगाव तालुक्यातील ४0 शिक्षक बाहेर जाणार असल्याचे सांगितले जाते. आधीच रिक्त पदे असलेल्या अशा तालुक्यात भविष्यात मोठा पेचप्रसंग उद्भवू शकतो. मात्र सर्वच प्रकारच्या बदल्या झाल्यानंतरच वास्तव चित्र स्पष्ट होणार आहे.
८३ शिक्षकांची जिल्ह्याबाहेर बदली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 12:58 AM