२०२२ पर्यंत देशातील सर्वांना घरे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सुरू केली आहे. २०२२ पर्यंत जवळपास २ कोटी ९५ लाख घरकुले उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या योजनेंतर्गत लाभार्थींना १ लाख ३० हजारांपर्यंत मदत दिली जाते. तसेच स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छतागृहासाठी निधी उपलब्ध करून दिला जातो. शिवाय मजुरीच्या स्वरूपात ९० ते ९५ दिवस अकुशल काम उपलब्ध करून दिले जाते. जिल्ह्यात २०१६-१७ ते २०२०-२१ पर्यंत ११ हजार २६२ घरकुल बांधकामाचे उद्दिष्ट दिले आहे. त्यापैकी ६ हजार २३५ घरकुले पूर्ण झाली आहेत. ३ हजार ५२३ लाभार्थींनाना घरकुल बांधकामाचा चौथा हप्ता देण्यात आला आहे. सध्या जिल्ह्यात ८ हजार ३७० लाभार्थींनी घरकुलांचे काम सुरू केले आहे. यासाठी जुने घर पाडले असून, बांधकामाच्या दुसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा आहे.
डोक्यावरील छपर गेल्याने हाल
जिल्ह्यात ६ हजार ४० लाभार्थींना घरकुलाचा तिसरा हप्ता मिळाला आहे, मात्र घरकुलाचे अद्याप काम पूर्ण झाले नसल्याने लाभार्थी कुटुंबीयांना उघड्यावर रात्र काढावी लागत आहे. सध्या थंडीचे दिवस असल्याने घराबाहेर कुडकुडत बसावे लागत आहे. अनेक ठिकाणी बांधकामासाठी वाळू मिळत नसल्याने बांधकामे थांबली होती. आता वाळू घाट मोकळे झाल्याने बांधकामाने गती घेतली असली तरी डोक्यावरील छप्पर गेल्याने गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
प्रतिक्रिया
पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुल मंजूर झालेल्या लाभार्थींना बांधकामाच्या टप्प्यानुसार त्यांच्या खात्यावर रक्कम जमा केली जात आहे. मध्यंतरी वाळूअभावी काही कामे थांबली होती. परंतु, आता वाळू घाट मोकळे झाल्याने घरकुलांचे बांधकाम पुन्हा सुरू झाले आहे. लाभार्थींना बांधकामाच्या टप्प्यानुसार त्वरित निधी दिला जात आहे.
-धन्वंतकुमार माळी, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा
घरकुल मंजूर झाले असून, मला पंधरा हजार रुपयांचा पहिला हप्ता मिळाला आहे. लोकांकडून कर्ज घेऊन वीट, रेती, सिमेंट आणले. शासनाचे जसे पैसे मिळतील तसे काम करणार आहे. मंजूर निधीमध्ये जेवढे काम होईल तेवढेच मी करणार.
- बालाजी खंडागळे, शेंदूरसना
घरकुल मंजूर झाल्यानंतर महिन्यापूर्वी १५ हजार रुपयांचा पहिला हप्ता मिळाला. घराचे बांधकाम स्वतःचे पैसे टाकून सुरू केले आहे. अभियंता बांधकामाची पाहणी करून गेले असून, लवकरच दुसरा हप्ता तुमच्या खात्यात जमा होईल, असे त्यांनी सांगितले.
- रत्नमाला कोपनर, शेंदूरसना
जिल्ह्यातील पंतप्रधान आवास योजनेची आकडेवारी
किती लोकांना पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुल मंजूर झाले. - ११,२६२
किती लोकांना ४० हजारांचा दुसरा हप्ता मिळाला. - ६५७७
किती लोकांना पुढील १ लाख ५ हजार मिळणे बाकी आहे. - ८३७०
तीन वर्षांत मंजूर झालेल्या घरकुलांची आकडेवारी
२०१७- ३७१५
२०१८- ४२१
२०१९-१७९५