हिंगोली: जिल्ह्यात तीन दिवस पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. आतापर्यंत जून ते सप्टेंबर या मान्सून कालावधीतील होणाऱ्या एकूण पावसाच्या सरासरी ८७.०२ टक्के पाऊस झाला. गतवर्षी याच कालावधीत १२०.४८ टक्के पाऊस झाला होता.
जिल्ह्यात मागील महिन्यात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. त्यामुळे नदी-नाल्यांना पाणी आले होते. त्यानंतर जवळपास एक महिना पावसाने पाठ फिरविल्याने पिके सुकत चालली होती. मात्र पुन्हा मान्सून पावसाने हजेरी लावली. सलग तीन दिवस कुठे रिमझिम तर कुठे मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याने पिकांना दिलासा मिळाला. ढगाळ वातावरण व रिमझिम पावसामुळे सूर्यदर्शनही झाले नव्हते. शनिवारीही जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस झाला. दरम्यान, जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या मान्सून कालावधीत वार्षिक सरासरीच्या ८७.०२ टक्के पाऊस झाला. यात सर्वाधिक पाऊस औंढा तालुक्यात झाला असून त्याची टक्केवारी १०५.५८ टक्के आहे. त्यानंतर कळमनुरी ९३.८४, सेनगाव ८४.२५, वसमत ८१.९८ तर हिंगोली तालुक्यात ७८.५२ टक्के पाऊस झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत आतापर्यंत २३.४६ टक्के पाऊस कमी झाला आहे. गतवर्षी याच कालावधीत १२०.४८ टक्के पाऊस झाला होता.
रविवारी १२ मिमी पाऊस
जिल्ह्यात रविवारपर्यंतच्या मागील ४८ तासात १२.३० मिमी पाऊस झाला. यात हिंगोली तालुक्यात १.३० मिमी., कळमनुरी ४२.७०, वसमत ८.६०, औंढा ६.०० सेनगाव ३.१० मिमी पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, रविवारी सायंकाळपर्यंत जिल्ह्यात आकाश कोरडे दिसून येत होते.