लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या हळदीला प्रतिक्विंटल ९ हजार रुपये भाव मिळत असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव नारायण पाटील यांनी दिली.
सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कापूस, मूग, उडीद आदीं पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. तसेच काही ठिकाणी जास्त पावसामुळे शेतकऱ्यांच्या हळदीचेही नुकसान झाले आहे. हळद उत्पादनात घट झाल्यामुळे बाजारात हळदीच्या दरात तेजी आली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत सद्यस्थितीत हळदीला प्रतिक्विंटल ९ हजार रुपये म्हणजेच गतवर्षीपेक्षा ३ हजार रुपये जास्त दर मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त हाेत आहे.
गतवर्षी बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या हळदीला प्रतिक्विंटल ५ ते ६ हजार रुपये दर होता. गतवर्षीपेक्षा यावर्षी दरात ३ हजारांनी वाढ झाली असल्याचे सचिव पाटील यांनी सांगितले. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अमरावती, यवतमाळ, परभणी, नांदेड, बुलढाणा, हदगाव, बीड आदी ठिकाणाहून शेतकरी दरवर्षी हळद घेऊन येतात. पंधरा-वीस दिवसांपासून शेतकरी जुनी हळद बाजार समितीत विक्रीसाठी आणत आहेत. येत्या १५ मार्चपासून नवीन हळद येणे सुरु होईल. सद्यस्थितीत रोज २०० ते ३०० क्विंटल हळद बाजार समितीत येत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आठवड्यातील तीन दिवस म्हणजेच सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी हळदीचे बीट होत आहे. यासंदर्भात तशी सूचना सर्व शेतकऱ्यांना दिली आहे.
कोरोनामुळे शेतकऱ्यांना बसला फटका
मार्च २०२०पासून कोरोनाचा सर्वत्र शिरकाव झाला होता. त्यामुळे मार्च ते ऑक्टोबर या दहा महिन्यांच्या काळात कोरोनाचे प्रमाण जास्त होते. जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार बाजार समितीतील व्यवहार कधी बंद तर कधी चालू ठेवावे लागत होते. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीमाल बाजार समितीत आणता आला नाही. परिणामी शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे.