लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील निवडणुकीत दुपारपर्यंत मंद असलेला मतदानाचा वेग दुपारनंतर वाढला. हिंगोली जिल्ह्यात दोघांचे मतदान न झाल्याने ९८.८८ टक्के मतदान झाले. परभणी जिल्ह्यात मात्र १00 टक्के मतदान झाले.जिल्ह्यात विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी निवडणुकीसाठी दुपारी २ वाजेपर्यंत दोन्ही जिल्ह्यांत मिळून ३६ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर मात्र मतदानाचा वेग वाढला. परभणी व हिंगोली जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या या मतदारसंघात सात मतदान केंद्र होते. यापैकी परभणी जिल्ह्यात ४ होते. यात परभणीत ५८ पुरुष व ७५ महिला अशा १३३, सेलूत २८ पुरुष व २६ महिला अशा ५४, गंगाखेड येथे ३४ पुरुष व ३६ महिला अशा ७0, पाथरीत ३0 पुरुष व ३५ महिला अशा ६५ जणांनी मतदान केले. तर हिंगोली जिल्ह्यात तीन मतदान केंद्र होते. यात हिंगोलीत १0९ पैकी १0७ जणांनी मतदान केले. यात ५0 पुरुष व ५७ महिलांचा समावेश आहे. हिंगोलीचे अपक्ष नगरसेवक नाना नायक यांना तडिपारीच्या कारणावरून मतदान करण्यास मज्जाव केला. त्यांना मतदान केंद्राबाहेर काढले होते. तर फाळेगाव सर्कलच्या काँग्रेसच्या जि.प.सदस्या सागर गौतम भिसे यांनी नाराजीतून मतदान केले नसल्याचे सांगितले जाते. तर मला पक्षश्रेष्ठींनी काहीच निरोप दिला नसल्याचे त्यांचे म्हणने आहे. कळमनुरी येथे पुरुष १0 तर महिला ९ अशा १९ जणांनी मतदान केले. वसमत येथे २७ पुरुष व २४ महिला अशा ५१ जणांनी मतदान केले. केवळ हिंगोली येथील दोघांनी मतदान न केल्याने मतदानाची एकूण टक्केवारी ९९.६0 झाली.हिंगोलीत अपक्ष नगरसेवक नरसिंग ऊर्फ नाना नायक यांना मतदान केंद्रावर आल्यानंतर तडिपारीच्या कारणावरून मतदान करू देण्यात आले नाही. याबाबत नायक यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह निवडणूक आयोग आदींना निवेदने पाठविली आहेत. या निवेदनात म्हटले की, मला ५ जूनपर्यंततडिपारीला स्थगिती असतानाही मतदानापासून वैयक्तिक कारणावरून वंचित ठेवल्याचा आरोप केला. तर पोलिसांना आजच्या तारखेत त्यांनी पत्र दिले. तसेच ते हिंगोलीच्या केंद्रात होते, असाही आरोप नायक यांनी केला आहे.याबाबत उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर म्हणाले, मी कळमनुरीच्या केंद्रावर होतो. मात्र नायक यांना तडिपार केल्यानंतर स्थगिती उठल्याचे कोणतेच पत्र मला आले नाही. त्यांनीही दाखविले नाही. त्यामुळे पोलिसांना पत्र दिलेले होते.ही निवडणूक सुरुवातीपासूनच विविध राजकीय घडामोडींनी गाजली. राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदार बाबाजानी दुर्राणी यांना डावलून काँग्रेसला ही जागा बहाल करण्यात आली. तर पारंपरिकरीत्या भाजपकडून कायम लढविल्या जाणाºया या जागेवर ऐनवेळी शिवसेनेने हक्क सांगितला. उमेदवारही दिला. त्यामुळे भाजपचे सुरेश नागरे हे तयारी करूनही ऐनवेळी शिवसेनेसोबत गेले. काँग्रेसचे सुरेश देशमुख व शिवसेनेचे विप्लव बाजोरिया हे आमने-सामने आल्याने पक्षीय संख्याबळावरून देशमुख यांचे पारडे जड होते. मात्र शेवटच्या टप्प्यात घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे ही निवडणूक एकतर्फी नाही, हे दिसून आले. आता यात बाजी कोण मारणार हे २४ मे रोजी कळणार आहे. मात्र मतदारांमध्ये या निवडणुकीबाबत फारसा उत्साह नव्हता. उमेदवारांनी नीट प्रचारही केला नाही. ‘भेटी’-गाठींचाही तुटवडाच होता. त्यामुळे ही नाराजी स्पष्टपणे जाणवत होती. तर आज एकट्या शिवसेनेचाच तंबू केंद्रासमोर दिसून आला.
विधान परिषदेसाठी ९८.८८ टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 12:33 AM