हिंगोली : जिल्ह्यात न्यायालयाने फरार घोषित केलेल्या ९९ व पोलिसांना पाहिजे असलेल्या २०० आरोपींना पकडण्यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. काही दिवसांपूर्वीच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका फरार आरोपीस पुणे जिल्ह्यातून तर पाहिजे असलेल्या एका आरोपीला हिंगोली शहरातून ताब्यात घेतले होते.
हिंगोली जिल्ह्यात न्यायालयाने फरार घोषित केलेले ९९ आरोपी फरार आहेत. या आरोपींना अटक करण्यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्न करीत आहे. मात्र हे आरोपी ओळख लपवून तसेच पत्ता बदलून फिरत असल्याने त्यांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे टाकले आहे. जिल्ह्यात सध्या हिंगोली शहर पोलीस ठाणे हद्दीत ११, कळमनुरी पोलीस ठाणे हद्दीत १, बासंबा १०, हिंगोली ग्रामीण ४, औंढा ४, सेनगाव ६, गोरेगाव ६, नरसी नामदेव ८, वसमत शहर ३७, हट्टा ६ तर आखाडा बाळापूर पोलीस ठाणे हद्दीतील ६ आरोपी फरार आहेत. बासंबा पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या खून प्रकरणातील एका फरार आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने काही दिवसांपूर्वीच पुणे जिल्ह्यातून ताब्यात घेतले आहे. त्यानंतर हिंगोली ग्रामीण पोलिसांना पाहिजे असलेल्या एका आरोपीस १० जूनच्या रात्री हिंगोली शहरातून ताब्यात घेतले. नऊ वर्षांपासून तो पोलिसांना गुुंगारा देत होता. फरार असलेल्या व पाहिजे असलेल्या आरोपींना शोधण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने माेहीम हाती घेतली आहे.
पोेलीस ठाणेनिहाय पाहिजे असलेले आरोपी
जिल्ह्यात विविध गुन्ह्यात पाहिजे असलेल्या आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. सध्या हिंगोली शहर पोलीस ठाणे हद्दीतील ४५, कळमनुरी २०, बासंबा ६, हिंगोली ग्रामीण ७, औंढा नागनाथ १०, सेनगाव ६, गोरेगाव १७, नरसी नामदेव १, वसमत शहर ३९, हट्टा २७, कुरूंदा ११, आखाडा बाळापूर ९ तर वसमत ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील पाहिजे असलेल्या दोन आरोपींच्या शोधात पोलीस आहेत.
फरार घोषित असलेल्या व पोलिसांना पाहिजे असलेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका फरार आरोपीस काही दिवसांपूर्वीच पुणे येथून ताब्यात घेतले आहे. तसेच एका पाहिजे असलेल्या आरोपीस पकडून हिंगोली ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
- उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, हिंगोली