हिंगोली: मराठा समाजाच्या मुला-मुलींनी शिक्षण घेऊनही काही उपयोग होत नाही, मराठा समाजाला आरक्षण नसल्यामुळे शैक्षणिक सुविधा मिळत नाहीत, या निराशेतून औंढा नागनाथ तालुक्यातील पोटा (बु.) येथील एका युवकाने सकाळी साडेअकरा वाजेदरम्यान शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
औंढा तालुक्यातील पोटा (बु) येथील योगेश कुंडलीकराव लोनसने (वय २२, रा. पोटा बु.) हा परभणी येथील महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेत होता, दरम्यान १२ वी पास झाल्यानंतर पोलीस भरतीसह विविध शासकीय नोकरी साठी प्रयत्न चालू होते. प्रयत्न करूनही नोकरी लागत नाही,शैक्षणिक सुविधा मिळत नाहीत, शासनाच्या योजनांचाही फायदा होत नाही आदी कारणांमुळे नैराशेमध्ये जगत होता. या नैराशेतून योगेश याने आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही या कारणामुळे पोटा (बु) येथील शेतात आत्महत्या केल्याचे कळताच औंढा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जी. एस. राहिरे, पोलिस उपनिरीक्षक मिथून सावंत, जमादार संदीप टाक, गजानन गिरी, ज्ञानेश्वर गोरे आदींनी घटनास्थळ गाठले. यानंतर युवकाचे प्रेत विच्छेदनासाठी औंढा ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. यावेळी डॉ. सतीश वाकळे यांनी शवविच्छेदन केले. रात्री उशिरापर्यत औंढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
खिश्यामध्ये सापडली चिट्ठी...आत्महत्येपूर्वी मनोज जरांगे पाटील यांच्या नावाने लिहून ठेवलेली चिट्ठी आढळली. त्यामध्ये जरांगे पाटील यांच्या कार्याचा गौरव करीत २४ डिसेंबर रोजी मराठा आरक्षणाबाबत निर्णय होणार होता परंतु हिवाळी अधिवेशनात आरक्षणाबाबत शासनाने ठोस भूमिका घेतली नाही त्यामुळे जीवनाचे शेवट करीत असल्याचे नमूद केले आहे.